



प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – चिमूर : तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय हे ग्रामीण भागातील हजारो नागरिकांसाठी आरोग्यसेवेचे प्रमुख केंद्र मानले जाते. मात्र सध्या या रुग्णालयातील एक्स-रे विभागात गंभीर तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने रुग्णांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एक्स-रे मशीनला योग्य व्होल्टेज मिळत नसल्यामुळे एक्स-रे प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे रोज रुग्णांची मोठी गर्दी होत असून नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
रुग्णालयात दररोज अपघातग्रस्त, वृद्ध, हाडांचे विकार असलेले तसेच विविध आजारांनी त्रस्त रुग्ण एक्स-रेसाठी येत असतात. मात्र व्होल्टेज कमी-जास्त होत असल्यामुळे मशीन व्यवस्थित सुरू होत नाही. परिणामी एका रुग्णाचा एक्स-रे करण्यासाठी बराच वेळ लागत असून बाहेर प्रतीक्षेत असलेल्या रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक रुग्णांना तासनतास रांगेत थांबावे लागत असून काही वेळा एक्स-रे न करताच परत जावे लागत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे.
विशेष म्हणजे ग्रामीण भागातून आलेले अनेक रुग्ण सकाळपासून उपाशीपोटी रुग्णालयात बसून असतात. वृद्ध महिला, लहान मुले तसेच गंभीर रुग्णांना उभे राहून प्रतीक्षा करावी लागत असल्याने त्यांचे हाल होत आहेत. काही नागरिकांनी सांगितले की, एक्स-रे विभागातील ही समस्या नवीन नसून गेल्या अनेक दिवसांपासून कायम आहे. मात्र प्रशासनाने अद्याप कायमस्वरूपी उपाययोजना केलेली नाही.
रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. “रुग्णालयात मूलभूत सुविधा नसतील तर सामान्य नागरिकांनी उपचारासाठी कुठे जावे?” असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. आरोग्य विभागाने तातडीने व्होल्टेज समस्या दूर करून स्वतंत्र वीज व्यवस्था किंवा स्टॅबिलायझरची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
दरम्यान, या समस्येमुळे रुग्णालयाच्या कामकाजावरही परिणाम होत असून डॉक्टरांनाही अडचणी निर्माण होत आहेत. एक्स-रे रिपोर्ट उशिरा मिळत असल्याने पुढील उपचार प्रक्रियेत विलंब होत आहे. यामुळे रुग्णांचा मानसिक आणि आर्थिक त्रास वाढत आहे.
तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी जिल्हा प्रशासन व आरोग्य विभागाने या गंभीर प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.














