मुंबईत होणारी ‘वेव्हज’ परिषद मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ‘दावोस’ ठरणार: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

0
41

उपमुख्यमंत्र्यांकडून परिषदेच्या तयारीची पाहणी

मुंबई – दि.29: मुंबई बीकेसी येथील जिओ वर्ल्ड सेंटर येथे १ ते ४ मे दरम्यान ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एंटरटेन्मेंट समिट’चा (वेव्हज) कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या समिटच्या तयारीची पाहणी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली.
वेव्हज २०२५ परिषद मुंबईत होतेय हे महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आहे. जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी ही परिषद ‘दावोस’ ठरणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले.
दुपारी तीनच्या सुमारास उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जिओ वर्ल्ड सेंटरला भेट दिली. यावेळी मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, प्रधान सचिव नविन सोना, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अनबलगन, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. वेलारसु आदी यावेळी उपस्थित होते. यावेळी परिषदेबाबत सादरीकरण करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाला मिळाले ही अभिमानाची बाब असून असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे आयोजन होत आहे असे सांगत उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुरदृष्टीतू‌न ही परिषद साकार होत आहे. विशेष म्हणजे प्रधानमंत्री मोदी १ मे रोजी संपूर्ण दिवसभर मुंबईत उपस्थित राहणार आहेत.
भारत जगात आघाडीवर आहे हे सिद्ध करण्यासाठी ही परिषद महत्वाची असून मुंबई हे देशाचे ग्रोथ इंजिन आहे तसेच मिडिया आणि मनोरंजनाचे हे केंद्र असल्याने या परिषदेमुळे मनोरंजन क्षेत्राला तांत्रिकदृष्ट्या नवी ओळख मिळणार असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले. या परिषदेमुळे आंतरराष्ट्रीय स्टुडिओज, प्रोडक्शन हाऊसेस, टेक कंपन्यांची भागीदारीची याची दारे खुली होतील असेही ते म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here