prabodhini news logo
Home ठळक बातम्या जनतेच्या लोककल्याणाचा ‘लोकदरबार’ मंत्री प्रताप सरनाईक यांचा मीरा-भाईंदरमध्ये ‘ऑन द स्पॉट’ फैसला;...

जनतेच्या लोककल्याणाचा ‘लोकदरबार’ मंत्री प्रताप सरनाईक यांचा मीरा-भाईंदरमध्ये ‘ऑन द स्पॉट’ फैसला; ७०% तक्रारींचे तात्काळ निराकरण

0
86

मीरा-भाईंदर : सामान्य नागरिकांच्या तक्रारींचा थेट निपटारा करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या लोकदरबारात आज मीरा-भाईंदरमध्ये प्रशासन आणि जनतेचा अभूतपूर्व संगम पाहायला मिळाला. महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या पुढाकाराने झालेल्या या उपक्रमात नागरिकांना प्रत्यक्ष न्याय मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या लोकदरबारात महापालिका, पोलीस, परिवहन आणि वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी एकाच छताखाली उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या तक्रारींवर जागच्या जागी निर्णय घेत सुमारे ७० टक्के तक्रारींचे तात्काळ निराकरण करण्यात आले.
अधिकाऱ्यांना फटकार, निष्काळजीपणावर कारवाईचा इशारा
कार्यक्रमादरम्यान काही अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत जाहीरपणे कानउघाडणी केली. “जनतेच्या कामात हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही,” असा इशारा त्यांनी दिला.
२७३ तक्रारी; महापालिकेविरोधातील सर्वाधिक नाराजी
लोकदरबारात एकूण २७३ नागरिकांनी तक्रारी मांडल्या. यामध्ये महापालिकेच्या कामकाजाविरोधात सर्वाधिक तक्रारी नोंदवण्यात आल्या. संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले.
७/११ कंपनीविरोधात कठोर भूमिका
नागरिकांनी ७/११ कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात संताप व्यक्त केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सखोल चौकशी करून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले.
दर महिन्याला लोकदरबार आयोजित करण्याची घोषणा
मीरा-भाईंदरकरांना दिलासा देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी दर महिन्याला लोकदरबार भरवण्याची घोषणा केली. यामुळे नागरिकांना त्यांच्या तक्रारींसाठी थेट व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.
“जनतेचा वेळ आणि पैसा महत्त्वाचा आहे. अधिकाऱ्यांनी लोकांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत,” असे मत त्यांनी व्यक्त केले.
जनतेचा वाढता विश्वास
या लोकदरबारामुळे प्रशासनातील दिरंगाईवर अंकुश बसणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. नागरिकांच्या प्रश्नांना थेट ‘मंत्रालयीन ताकद’ मिळाल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here