
ग्राम काॅंग्रेस अध्यक्ष, सचिव व सोशल मीडिया प्रमुख यांची उपस्थिती
रविंद्र मैंद
ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी
प्रबोधिनी न्यूज
ब्रम्हपूरी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने ब्रम्हपूरी विधानसभा मतदारसंघाअंतर्गत येणाऱ्या ब्रम्हपूरी तालुक्यातील सर्व गावांतील ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष, सचिव व सोशल मीडिया प्रमुख यांची बैठक तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके यांच्या अध्यक्षतेखाली ब्रम्हपूरी येथे आयोजित करण्यात आली होती.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य डॉ. राजेश कांबळे, शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हितेंद्र राऊत, राजीव गांधी पंचायतराज संघटनचे प्रदेश महासचिव थानेश्वर कायरकर, माजी पं.स. सभापती नेताजी मेश्राम, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष सोनू नाकतोडे, अनुसूचित जाती सेलचे तालुकाध्यक्ष प्रमोद मोटघरे, तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष नामदेव लांजेवार, महिला काॅंग्रेसच्या तालुकाध्यक्षा मंगला लोनबले, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, नगरपरिषदेच्या महीला व बालकल्याण सभापती सुनिता तिडके, नगरसेविका लता ठाकुर, माजी जि.प. सदस्या भावना ईरपाते, अनुसूचित जाती सेलचे जिल्हा सहसचिव प्रा. डि. के. मेश्राम हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवर यांनी बैठकीच्या प्रसंगी उपस्थित असलेल्या ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष, सचिव व सोशल मीडिया प्रमुख यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, काॅंग्रेस पक्षाच्या बळकटीकरणासाठी आपण आपल्या गावस्तरावर मोठ्या जोमाने काम करावे. काॅंग्रेस पक्षाचे विचार हे सर्वधर्मसमभावाचे असुन तळागाळातील सामान्य माणसाचा विकास झाला पाहिजे हे काॅंग्रेस पक्षाचे पुर्वीपासुनच ध्येय आहे. समाजातील प्रत्येक घटकाला त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी पक्षाचे कार्य सुरुच आहे. त्यामुळे तळागाळातील लोकांपर्यंत पक्षाचे विचार, ध्येय धोरणे पोहचवण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांनी पार पाडावी असे आवाहन देखील यावेळी करण्यात आले.
बैठकीचे सुत्रसंचालन राहुल मैंद यांनी केले. बैठकीला मोठ्या संख्येने ब्रम्हपूरी तालुक्यातील सर्व गावांतील ग्राम काॅंग्रेस कमेटीचे अध्यक्ष, सचिव व सोशल मीडिया प्रमुख यांची उपस्थिती होती.














