समुदाय आरोग्य अधिकारी 1 ऑक्टोबर पासून संपावर
7 ऑक्टोबर ला मुंबई येथे लाक्षणिक आंदोलन .
नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि ३० सप्तेबर २०२४:- महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने महाराष्ट्रातील समुदाय आरोग्य अधिकारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या संदर्भात दिनांक 1 ऑक्टोबर पासून ते 7 ऑक्टोबर पर्यंत संप पुकारून ऑनलाईन काम बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच 7 ऑक्टोबर ला मुंबई येथे आझाद मैदान येथे एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात येणार असल्याचे प्राप्त झालेल्या निवेदनात म्हटले आहे. महाराष्ट्रातील शासन लाडकी बहीण, लाडका भाऊ अशा अनेक योजना काढत आहे मात्र आरोग्य विभागात कोरोना सारख्या महामारीला सुरक्षेचे कवच बनून अनेक लोकांचे प्राण वाचविले आहे. अहोरात्र मेहनत करून आरोग्य सेवा दिलेल्या कोरोना योद्धा यांच्या मागण्या मान्य करायला आरोग्य मंत्री व मुख्यमंत्री दुर्लक्ष करित आहेत. 10 हजार 700
समुदाय आरोग्य अधिकारी हे 2016 पासून ग्रामीण भागातील उपकेंद्रात कार्यरत आहेत. केंद्र शासनाने आयुष्यमान भारत या उपक्रमांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांची नेमणूक केली व ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थाला प्राधान्य दिले. आयुष्मान भारत या महत्वाकांक्षी प्रकल्पाला योग्य न्याय देण्याचा नेहमी मनापासून प्रयत्न करीत आहेत . त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री यांच्या माता सुरक्षित , घर सुरक्षित, जागरूक पालक , सुदृढ बालक, निरोगी आरोग्य तरुणाईचे वैभव अशा शासनाच्या आरोग्य विभागाच्या अभियानाला समुदाय आरोग्य अधिकारी यांनी ऑनलाईन व ऑफलाइन कामे करून न्याय देण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केलेला आहे. कोरोना काळात दोन ते तीन वर्ष महाराष्ट्र राज्यातील समुदाय आरोग्य अधिकारी यांनी कोरोना बाधित रुग्णाच्या प्रत्यक्ष संपर्कात राहून सेवा दिली तरी सुद्धा शासन अन्याय करित आहे. त्यामुळे आंदोलनाचे पाऊल उचलावे लागले. मागण्या मध्ये पदनिर्मिती व सेवा समायोजन करून गट ‘ब’ चा दर्जा देण्यात यावा , सरसकट मानधन 55 हजार प्रति महिना देण्यात यावा व त्यावर दरवर्षी 5% वाढ द्यावी, अतिरिक्त उपकेंद्रचा पदभार दिल्यास त्याचे पंधरा हजार रुपये प्रति महिना द्यावा , टप्पा- टप्प्याने आयुष्यमान आरोग्य मंदिर कार्यान्वित केल्याने बरेचसे समुदाय आरोग्य अधिकारी यांना गृह जिल्हा सोडून इतर जिल्हा सेवा द्यावी लागत आहे त्यामुळे त्यांना लवकरात लवकर बदली धोरण करून लागू करावे व योग्य ते न्याय द्यावा, इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे समुदाय आरोग्य अधिकारी सुद्धा आरोग्य सेवा देत असताना त्यांना प्रवासाचा खर्च स्वतः करावे लागत असल्यामुळे त्यांना प्रवास भत्ता देऊन विमा कवच सुद्धा लागू करण्यात यावे. व इतर मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेच्या वतीने 1 ऑक्टोबर पासून कामबंद आंदोलन पुकारण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र राज्य समुदाय आरोग्य अधिकारी संघटनेचे राज्याध्यक्ष डॉ अंकुश मानकर , राज्य उपाध्यक्ष अजिंक्य शेळके, जिल्हाध्यक्ष डॉ राकेश येरणे , जिल्हा महिला प्रतिनिधी डॉ. स्वाती कामडी, जिल्हा उपाध्यक्ष डॉ मनिष रोहणकर, सल्लागार डॉ मधुकर पटले यांनी दिली आहे.

