
शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – दिनांक 29 जून 2025 रोजी, रविवार, आविष्कार चे अध्यक्ष अश्विन जगताप व महिला अध्यक्षा शीतल काकडे यांच्या अध्यक्षतेखाली महिलांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने समाजोपयोगी उपक्रम घेण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाची सुरुवात मोना देशपांडे, प्रतीक्षा देसाई व एकता गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त कारंजा येथील वृद्धाश्रमाला भेट देऊन करण्यात आली. या भावनिक उपक्रमात संपूर्ण कार्यकारिणीने सहभाग घेतला.
या भेटी दरम्यान वृद्धांना आसन व नाश्त्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी वृद्धांशी संवाद साधताना त्यांनी सांगितले, “तुम्ही कोणाच्या तरी सुना आहात, आम्ही जरी इथे आनंदात असलो तरी आमच्या माणसांची आठवण नेहमी येते. तुम्ही अशी वेळ तुमच्या घरातल्या कुणावरही येऊ देऊ नका.” त्यांनी उपस्थितांचे आभार मानत संस्थेतील व्यवस्थापनाचेही कौतुक केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनामागे आविष्कार महिला मंच च्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे अथक परिश्रम होते. संवेदनशीलतेने भरलेल्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.















