शहराचे रूपडे पालटणार – 43 कोटींच्या विकास निधीतून तलाव व बाजाराचे सौंदर्यकरण
रविंद्र मैंद ब्रम्हपुरी तालुका प्रतिनिधी प्रबोधिनी न्यूज – मी लोकप्रतिनिधी होण्यापूर्वी मागील दहा वर्षाच्या काळात ब्रह्मपुरी शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्र विकासात्मक दृष्ट्या मागासलेला होता. तसेच विरोधी बाकावर बसून मी माझ्या अनुभवाच्या बळावर कोट्यावधींचा विकास निधी खेचून आणला. त्याचे आज फलित म्हणून संपूर्ण विधानसभा क्षेत्राचा झपाट्याने विकास होत असून शिक्षणाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ब्रह्मपुरी शहराला भरघोस विकास निधीतून सुंदर शहर म्हणून ओळखल्या जाणार असून मी या शहरासह संपूर्ण विधानसभा क्षेत्राच्या विकासासाठी सदैव प्रयत्नशील राहील. असे प्रतिपादन राज्याचे लोकलेखा समिती अध्यक्ष तथा विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी केले. ते ब्रह्मपुरी येथे नुकताच संपन्न झालेल्या 43 कोटींच्या विकास कामांच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.
आयोजित भूमिपूजन सोहळ्यास प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती म्हणून चिमूर गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान, काॅंग्रेस ,ज्येष्ठ नेते डॉ. देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, माजी सभापती डॉ. राजेश कांबळे, माजी जि.प.सदस्य प्रमोद चिमुरकर, माजी नगरसेवक हितेंद्र राऊत, न.प.माजी उपाध्यक्ष अशोक रामटेके, मुख्याधिकारी अर्शिया जुही, माजी न.प.उपाध्यक्ष बंटी श्रीवास्तव, माजी नगरसेवक महेश भर्रे, प्रितीश बुरले, माजी नगरसेवक सागर आमले,माजी नगराध्यक्षा वनिता ठाकूर, माजी नगराध्यक्षा योगिता बनपुरकर, महीला काँग्रेसच्या शहराध्यक्षा योगिता आमले, कृउबा उपसभापती सुनीता तिडके, माजी नगरसेविका अंजली उरकुडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले की, सत्ता येत असते सत्ता जात असते कुणाचीही सत्ता कायमस्वरूपी टिकून राहत नाही. मात्र तुमच्या आशीर्वाद रुपी बळाच्या जोरावर विरोधी बाकावरूनही मी प्रचंड निधी खेचून आणला. आज या संपूर्ण विधानसभा क्षेत्रात सह ब्रह्मपुरी शहरात झालेल्या विकास कामांचे तुम्ही साक्षीदार आहात. शहरातील जुन्या तलावांचे सौंदर्यकरण व आठवडी बाजाराचे नूतनीकरण यातून नागरिकांना विशेष सोयीसुविधासह निसर्गरम्य वातावरणाच्या सानिध्यात मनसोक्त आनंद लुटण्याचा विरंगुळा लाभणार असून शहरातील आबाल वृद्ध नागरिकांसह इतर शहरातील नागरिक देखील याचा आस्वाद घेऊ शकणार. शहराच्या विकासाला काही विघ्न संतोषी कडून अडथळा निर्माण होत आहे. त्यांना शहराच्या सर्वांगीण विकासाचे चित्र डोळ्यात खूपते आहे .त्यांच्या कसा बंदोबस्त करायचा यावरही माझ्याकडे उपाय योजना आहेत असेही ते यावेळी आवर्जून म्हणाले.
मार्गदर्शनपर बोलताना चिमूर-गडचिरोली क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान म्हणाले की, सत्तेतील केंद्र व राज्य सरकारकडून निधी वाटपात दुजाभाव केला जातो. तसेच निधी मिळविण्यासाठी विविध किचकट प्रक्रियांना सामोरे जावे लागते. मात्र विधिमंडळ पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांची आक्रमक शैली व विकासात्मक दूरदृष्टीकोण व कार्यपद्धती यापुढे विरोधकांना विकास निधी देण्यास भाग पडावे लागत असून तुम्हाला लाभलेले क्षेत्र प्रतिनिधी एक कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी असल्याचे ते यावेळी म्हणाले.
तत्पूर्वी ब्रह्मपुरी शहराती नगरपरिषद अंतर्गत केंद्रशासनाच्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजना अंतर्गत बोडीचे सौंदर्यीकरण (जलतरण तलावाजवळ) 12.27 कोटी, आठवडी बाजार सौंदर्यीकरण (बाजार चौक) 10.71 कोटी
लेंढारा तलाव सौंदर्यीकरण 19.66 कोटी अशा एकूण 43 कोटींच्या विकास कामांचा भूमिपूजन सोहळा थाटात संपन्न झाला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याधिकारी अर्शिया जुही सुत्रसंचलन इंजी.मंगेश बोंद्रे यांनी केले.तर आभार इंजी. अविनाश यांनी मानले. आयोजित भूमिपूजन सोहळा कार्यक्रमास काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच शहरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.

