फुरकानिया मस्जिद परिसरात नाली बांधकाम व पिण्याच्या पाण्याच्या समस्येवर माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाकडून मनपा आयुक्तांना निवेदन

0
49

सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका 9970998613 – चंद्रपूर: दिनांक 12 जून 2025 रोजी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघाचे जिल्हाध्यक्ष हिमा यूं अली यांनी चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त यांना निवेदन सादर केले. हे निवेदन फुरकानिया मस्जिदजवळ, डीआयसी कार्यालयाच्या मागे, इराणी मोहल्ला, प्रभाग क्रमांक 6 या भागात नालीच्या बांधकामासह पिण्याच्या पाण्याच्या गंभीर समस्यांबाबत देण्यात आले.

निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, या भागातील नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची टंचाई व सांडपाणी निचऱ्याच्या मूलभूत समस्यांशी सामना करत आहेत. या भागातील जुने नळ बंद असून, अमृत योजनेतील नवीन नळ सुरू होण्यासाठी अद्याप बराच कालावधी लागणार आहे. सद्यस्थितीत नागरिकांना मनपाच्या टँकरद्वारे दर दोन दिवसांनी पाणी पुरवठा केला जातो, ज्यामुळे नागरिकांना दैनंदिन जीवन जगण्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

याशिवाय, अपूर्ण नाल्यांमुळे परिसरात साचलेले सांडपाणी आरोग्यास गंभीर धोका निर्माण करत असून, रोगराई पसरण्याचा धोका वाढत आहे.

निवेदनात मुख्यतः दोन मागण्या करण्यात आल्या आहेत:

1. तातडीने नवीन नाल्याचे बांधकाम सुरू करण्यात यावे.

2. पिण्याच्या पाण्याच्या समस्येच्या कायमस्वरूपी उपाययोजनेसाठी योग्य व्यवस्था करण्यात यावी.

या प्रसंगी उपस्थित महासंघाच्या प्रतिनिधींनी संबंधित विभागांना तात्काळ निर्देश देऊन समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here