prabodhini news logo
Home ठळक बातम्या राज्यातील पहिली पाळीव प्राणी स्मशानभूमी आता मिरा-भाईंदरमध्ये : मंत्री प्रताप सरनाईक यांच्या...

राज्यातील पहिली पाळीव प्राणी स्मशानभूमी आता मिरा-भाईंदरमध्ये : मंत्री प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून ऐतिहासिक उपक्रमाचा शुभारंभ

0
251

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे

मिरा-भाईंदर : पाळीव प्राण्यांना सन्मानपूर्वक निरोप देण्याची व्यवस्था आता वास्तवात आली आहे. मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या नवघर स्मशानभूमी येथे राज्यातील पहिल्या पाळीव प्राणी स्मशानभूमीचे लोकार्पण सोमवारी (दि. २६ सप्टेंबर) महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. प्रताप सरनाईक यांच्या संकल्पनेतून करण्यात आले.

पाळीव प्राण्यांच्या अंत्यविधीची गंभीर समस्या संपली..

आजवर पाळीव प्राण्यांचा मृतदेह योग्य व्यवस्था नसल्यामुळे नदी-नाले, खाड्या किंवा कचरा कुंडीत टाकला जात असे. यामुळे दुर्गंध, रोगराई आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत होत्या. आता मंत्री सरनाईक यांच्या पुढाकारातून प्राणीप्रेमींसाठी दिलासा देणारी आणि पर्यावरणपूरक अशी ही सुविधा उपलब्ध झाली आहे.

गॅस शवदाहिनीमुळे पर्यावरणाचे रक्षण

नवघर स्मशानभूमी येथे उभारण्यात आलेली शवदाहिनी गॅसवर चालणारी असून नैसर्गिक वायू आणि एलपीजीचा वापर यात होणार आहे. या आधुनिक प्रक्रियेमुळे मृतदेहाचे वायू व राखेत रुपांतर होते आणि लाकूड जाळण्यामुळे होणारे प्रदूषण टळणार आहे. लवकरच काशिमिरा येथेही अशीच स्मशानभूमी सुरू होणार असल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.

प्राणीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

या उपक्रमाचे मिरा-भाईंदरमधील प्राणीप्रेमी नागरिकांनी स्वागत केले आहे. स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि प्राण्यांप्रती आपुलकी – या तिन्ही गोष्टींचा संगम या प्रकल्पातून साधला गेला असल्याचे त्यांनी नमूद केले.

मंत्री सरनाईक म्हणाले, “पाळीव प्राणी हे अनेक घरांतील कुटुंबीयासारखे असतात. त्यांच्या अंत्यविधीसाठी सुसज्ज व सन्माननीय व्यवस्था करणे ही काळाची गरज होती. मिरा-भाईंदरमधील हा उपक्रम राज्यातील इतर शहरांसाठी आदर्श ठरेल आणि पुढे अशा सुविधा सर्वत्र निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू राहतील.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here