prabodhini news logo
Home चंद्रपूर १५ दिवसांत शेतकऱ्यांना पाणी न दिल्यास तीव्र जनआंदोलन..

१५ दिवसांत शेतकऱ्यांना पाणी न दिल्यास तीव्र जनआंदोलन..

0
118

गोसेखुर्द उजवा कालवा कामात सत्ता पक्षीय नेत्यांचा हस्तक्षेप; वर्षभरात केवळ १० टक्के काम

रविंद्र मैंद तालुका प्रतिनिधी, ब्रम्हपुरी – ब्रम्हपुरी तालुका व परिसरातील हजारो शेतकऱ्यांची रब्बी तसेच उन्हाळी हंगामातील शेती सध्या पाण्याअभावी अडचणीत आहे. गोसेखुर्द प्रकल्पाच्या उजव्या कालव्याच्या आरबीसी कॅनलचे काम गेल्या वर्षभरापासून अत्यंत संथ गतीने सुरू असून सुमारे १५ हजार हेक्टर शेतीला त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.

आज या प्रश्नावर शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींसह गोसेखुर्द उजवा कालवा विभाग, ब्रम्हपुरी कार्यालयाला भेट देत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या रास्त मागणीला न्याय देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना धारेवर धरले.

अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सत्ता पक्षातील एका नेत्याचा कंत्राटात थेट सहभाग असल्याने कालव्याचे काम संथ गतीने चालू आहे. केवळ १० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामात अकार्यक्षमता व अडथळे जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर, १५ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी उपलब्ध करून न दिल्यास मुख्य अभियंता कार्यालयाला घेराव घालून तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

विदर्भातील सर्वात मोठा जलप्रकल्प म्हणून प्रसिद्ध असलेल्या गोसेखुर्द प्रकल्पाची मुहूर्तमेढ काँग्रेस सत्ताकाळात मी राज्यमंत्री असताना करण्यात आली होती. तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात ५ हजार कोटी रुपयांचा विकास निधी मंजूर करून घेतला गेला, ज्यामुळे आज विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती ओलिताखाली आली आहे.

या प्रकल्पाच्या उजव्या कालव्यातून ब्रम्हपुरी व लगतच्या भागातील शेतांना रब्बी पिक व उन्हाळी धानासाठी पाणी मिळावे, या हेतूने आरबीसी कॅनलचे काम मंजूर करण्यात आले. परंतु ऑक्टोबर २०२४ मध्ये कार्यारंभ आदेश मिळूनही (अंदाजित किंमत ₹२५० कोटी) हे काम थंडबस्त्यात गेले आहे. सर्ला व खडतकर कंपनीकडे कंत्राट असून सत्ता पक्षीय हस्तक्षेपामुळेच दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या संदर्भात मुख्य अभियंता गवळी यांच्याशी फोनवरून संवाद साधत, शेतकऱ्यांना पाणीपुरवठा तातडीने सुरू करण्याचे निर्देश देण्यात आले. अन्यथा तीव्र आंदोलनाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी, असा इशारा देण्यात आला. यावर गवळी यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरच शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.

या बैठकीस काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रा. देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस अध्यक्ष खेमराज तिडके, शहराध्यक्ष हितेंद्र राऊत, माजी जिल्हा परिषद सभापती डॉ. राजेश कांबळे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद चिमूरकर, माजी नगरसेवक डॉ. नितीन उराडे, तसेच काँग्रेस व युवक काँग्रेस पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here