
अतिवृष्टी अनुदानासह ग्रामविकासाच्या प्रश्नांवर तात्काळ कारवाईचे निर्देश
सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी उत्तर सोलापूर तालुक्यातील गावडी दारफळ येथे भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधला. गावातील विविध तातडीच्या प्रश्नांवर प्रत्यक्ष चर्चा करून तत्काळ उपाययोजना करण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना फोनद्वारे स्पष्ट निर्देश दिले.
ग्रामस्थांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्याकडे अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या विविध समस्यांची मांडणी केली. यात अतिवृष्टी अनुदानाचा विलंब, दुरुस्तीअभावी बिघडलेले रस्ते, संजय गांधी निराधार योजनेंतील अडथळे, अतिवृष्टीत पडझड झालेली घरे, मृत्यूमुखी पडलेली जनावरे, बुजलेल्या विहिरी, कृषी जमिनींचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान यांसारख्या गंभीर मुद्द्यांचा समावेश होता. सर्व प्रकरणांचा पंचनामा त्वरीत पूर्ण करण्यासाठी व लाभ तातडीने मिळावा यासाठी खासदार शिंदे यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
ग्रामपंचायतमार्फत सुरू असलेल्या जनजीवन मिशन व घरकुल योजना संदर्भात काही गावकऱ्यांनी केलेल्या तक्रारींचा घेतलेला गंभीर दखल घेत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधून आवश्यक ती कारवाई करण्यास सांगितले.
या दौऱ्यावेळी गावडी दारफळचे सरपंच भारत माळी, जिल्हा काँग्रेस समन्वयक मनोज यलगुलवार, ग्रा.पं. सदस्य नागेश पवार, सुधाकर पवार, मनोज घोलप, परमेश्वर थिटे, दयावान पवार, शत्रुघ्न पवार, किशोर माळी, समाधान पवार, महादेव भंडारे, काका सुर्वे, शशिकांत पाटील, जयवंत कोळी, पोपट लांडगे यांच्यासह अनेक ग्रामस्थ व विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
खासदार प्रणिती शिंदे यांच्या या भेटीमुळे दारफळ गावडीतील प्रलंबित प्रश्न मार्गी लागण्यास मोठी गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.















