
कोरची प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क : केवळ पुस्तकी ज्ञानच नाही, तर वैज्ञानिक दृष्टिकोन आणि क्रीडा क्षेत्रातही आश्रमशाळेचे विद्यार्थी आता मागे राहिलेले नाहीत. आदिवासी विकास विभाग नागपूरद्वारे चंद्रपूर येथे आयोजित विभागीय विज्ञान प्रदर्शन व क्रीडा स्पर्धेत, शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा कोरचीच्या विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्याची चुणूक दाखवत घवघवीत यश संपादन केले आहे.
‘प्रकाशाद्वारे मेसेज सेंडींग’ मॉडेलची छाप
यावर्षी प्रथमच विज्ञान प्रदर्शनाचा समावेश करण्यात आला होता. या स्पर्धेत नागपूर विभागातील अनेक नामांकित अनुदानित व शासकीय आश्रमशाळांनी सहभाग नोंदवला होता. यामध्ये कोरची आश्रमशाळेच्या इयत्ता ११ वी (विज्ञान) मधील विद्यार्थिनी कु. निखिता कांटेगे आणि कु. प्रणाली नुरुटी यांनी सादर केलेल्या ‘ प्रकाशाद्वारे मेसेज सेंडिंग’ (Message Sending) या मॉडेलने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. उच्च माध्यमिक गटातून या मॉडेलने द्वितीय क्रमांक पटकावून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला.

मार्गदर्शक आणि प्रेरणा
या यशामागे विद्यार्थ्यांना लाभलेले योग्य मार्गदर्शन अत्यंत महत्त्वाचे ठरले. क्रिष्णा गावळे सर, सुमन अडभैया आणि प्रमोद शंभरकर यांनी या विद्यार्थिनींना तांत्रिक व वैज्ञानिक मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळेत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
विजेत्यांचा जंगी सत्कार
स्पर्धेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यासाठी शाळेत एका विशेष अभिनंदनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी कोरची पोलीस स्टेशनचे पी.आय. शैलेंद्र ठाकरे यांच्या हस्ते विजेत्या विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक उमाकांत ढोक, प्रा. हरेश कामडी,प्रा.अरुण कायंदे, प्रा.अभिमन्यू वाटगुरे, प्रा.मनोज गजभिये, प्रा.धनश्री परतेती, भैयालाल कुरसंगे, गुरुराज मेंढे, कुणाल गोवर्धन, गीता राऊत, डाकराम ठाकरे, मनोज आचार्य, चंद्रकला पटले, भारती साखरे, सुषमा आंबोणे, मयूर दोनाडकर,भुमेश शेंडे,प्रीती खंडाते, क्रीडा प्रमुख अमित मेश्राम, अरुण कायंदे आणि इतर शिक्षक कर्मचारी उपस्थित होते. “आदिवासी भागातील मुलांमध्ये प्रचंड प्रतिभा असून त्यांना योग्य संधी मिळाल्यास ते आकाश कवेत घेऊ शकतात,” असे मत यावेळी शैलेंद्र ठाकरे पी.आय यांनी व्यक्त केले. आभारप्रदर्शन अरुण कायंदे यांनी केले.















