prabodhini news logo
Home कारंजा करंजऋषींच्या पौराणिक कारंजा नगरीत, दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ७२६ व्या जन्मोत्सवाला...

करंजऋषींच्या पौराणिक कारंजा नगरीत, दत्तावतार नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या ७२६ व्या जन्मोत्सवाला थाटात प्रारंभ.

0
117

शारदा भुयार वाशिम जिल्हा प्रतिनिधी – कारंजा : वसिष्ठ ऋषीचे सप्तर्षी शिष्यांमधील महर्षी करंज ऋषींनी स्थापन केलेल्या पौराणिक,आध्यामिक,धार्मिक व ऐतिहासिक अशा कारंजा नगरीत, प्रभू दत्तात्रयाचा अवतार मानल्या जाणाऱ्या श्री. नृसिंह सरस्वती स्वामी महारांजाचा जन्म झाला होता. तेव्हापासून कारंजा नगरी ही दत्तउपासकांचे माहेरघर पंढरी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे देशविदेशातील दत्तउपासक श्री नृसिह सरस्वती स्वामी महाराजांचे जन्मस्थान ‘याची देही याची डोळा’ पाहण्यासाठी दुरवरून कारंजा नगरीत येत असतात. स्थानिक श्री नृसिह सरस्वती स्वामी संस्थान कारंजा कडून स्वामी महाराजांचा जन्मोत्सव तब्बल ४५ दिवस साजरा करण्यात येतो. यंदा ७२६ व्या जन्मोत्सवास कारंजा येथील पवित्रपावन गुरू मंदीरात दि २२ डिसेंबर २०२५ पासून सुरुवात झालेली असून हा उत्सव ४५ दिवस चालणार आहे. तसेच दि. ०२ फेब्रुवारी २०२६ रोजी शैलगमन यात्रेने या महोत्सवाची सांगता होणार आहे.

पौष शु. द्वितीया रोज सोमवार अर्थात २२ डिसेंबर २०२५ रोजी नृसिंह सरस्वती स्वामी महाराज यांचा ७२६ वा जन्मोत्सवास सुरुवात झालेली आहे. दि.२३ डिसेंबर २०२५ ला कलश स्थापनेनंतर अखंड गुरुचरित्र पारायणाला प्रारंभ झालेला असून, दि .२४ डिसेंबर २०२५ ते २८ जानेवारी २०२६ पर्यंत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानिमित्त होणाऱ्या धार्मिक व आध्यात्मिक महोत्सवात, देश विदेशातील गायक, संगीतकार, किर्तनकार, प्रवचनकार, लोककलावंत,पुरुष भजनी मंडळ, महिला भजनी मंडळ या उत्सवात सहभागी होऊन श्री चरणी आपली सेवा देणार आहेत. स्थानिक किर्तनकार हभप सुशीलबुवा देशपांडे कारंजा, हभप राजेंद्रबुवा मांडेवाल मुंबई, हभप अविनाशबुवा परळीकर कारंजा, हभप शरदबुवा घाग नृसिंहवाडी, हभप प्रज्ञा देशपांडे पुणे, हभप दिगबरबुवा नाईक नागपूर, हभप कौस्तुबबुवा परांजपे पुणे, हभप अंजली पिंजरकर कारंजा, हभप संगीता गलांडे नागपूर, अश्विनी सस्तकर कारंजा इत्यादी मंडळी आपल्या किर्तनाची सेवा देणार आहेत तसेच सुप्रसिद्ध गायक अजित कडकडे, प्रथमेश लघाटे, मुग्धा लघाटे वैश्यपायन, पं कृष्णेन्द्र वार्डीकर हुबळी, पं. भुवनेश कोमकली देवास, हेमांगी नेने हैद्राबाद यांचे गायन अनेक प्रवचनकारांचे प्रवचन राहणार असून, मानवी आरोग्यासाठी रोगनिदान आरोग्य शिबीर,नेत्र तपासणी, भक्तिसंगीत इत्यादी कार्यक्रम संपन होणार आहेत. असून दिनांक २९ जानेवारी २०२६ ला रुद्र स्वाहाकार व शतचंडी स्वाहाकार यज्ञास
सुरुवात होईल, दिनांक ३० जानेवारीला आर्ट ऑफ लिव्हिंग परिवाराचा सतसंग, दिनांक ३१ जानेवारीला श्री वसंतपुजा, दिनांक ०१ फेब्रुवारी २०२६ ला श्रीं ची पालखी सोहळा, ०२ फेब्रुवारी २०२६ ला यज्ञ पुर्णाहुती, महाप्रसाद व संध्याकाळी श्री शैलगमन शोभायात्रा श्रीच्या पालखीची शहरातील मुख्य मार्गावरुन परिक्रमण करीत ०३ फेब्रुवारी २०२६ ला सकाळपर्यंत मंदिरात पोहोचल्यानंतर जन्मोत्सवाची सांगता होईल जन्मोत्सवानिमित्त मंदिराला आकर्षक अशी फुलांची, विद्युत रोषनाईची सजावट करण्यात आली आहे. या जन्मोत्सव सोहळ्याची पुर्वतयारी व उत्सव कालावधीतील विविध कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडावे याकरीता श्री. गुरूमंदौर संस्थान उत्सव समितीच्या वतीने चांगले नियोजन करण्यात आले आहे. आयोजित केलेल्या धार्मिक कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन गुरुमंदिर संस्थान विश्वस्तांच्या वतीने करण्यात आले आहे.असे वृत्त श्रींच्या भक्तपरिवारातील ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here