
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज – आष्टी: स्वातंत्र्याच्या ७५ वर्षानंतरही आदिवासींचे जीवनमान अजूनही फारसे बदलले नाही. त्यांच्या समस्या अजूनही कायम आहेत. आदिवासी जीवन वास्तव दर्शविणारी नाटके तुरळक स्वरूपामध्ये आली. त्यातली बोटावर मोजणारी प्रकाशित झाली.अनेक संहितांचे प्रयोग झाले.परंतु त्यात केवळ आदिवासींच्या वेदना, अवहेलना, दारिद्र्य ,दुःख व शोषण याचे चित्रण प्रकर्षाने करण्यात आले. त्यातही नाटक पाहणारे प्रेक्षक किती? नाटक पाहिल्याने त्यांच्या जीवनमानात कितपत बदल घडला, हा चिंतनाचा विषय आहे.आदिवासींच्या जीवनातील गंभीर प्रश्न जटिल आणि गुंतागुंतीचे आहेत . वर्ण व वर्ग विषमतेने नागावला गेलेले आदिवासी बांधव अजून एक दुर्लक्षित आहेत त्यांचे वनवासीकरण करणे सुरू आहे .मूळ संस्कृती पासून त्यांना हद्दपार करण्याची प्रक्रिया खाऊजा व भांडवलशाही धोरणामुळे फोफावली आहे. अनेक धर्म प्रसारक आदिवासींचे वंश विच्छेदन करू पाहत आहेत. उदात्त आणि उन्नत निसर्गापासून हद्दपार होणारा आदिम बांधव व त्याचे प्रत्ययकारी चित्रण नाटकातून फारसा दिसत
नाही. असे प्रतिपादन निर्माता, दिग्दर्शक, नाट्यकलावंत ज्येष्ठ रंगकर्मी प्रा. डॉ.शेखर डोंगरे यांनी केले. ते मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ मुंबई अनुदानित वन वैभव शिक्षण मंडळ अहेरी द्वारा संचालित महात्मा ज्योतिबा फुले महाविद्यालय आष्टी येथे आयोजित गडचिरोली जिल्हा पहिले आदिवासी साहित्य संमेलनात आदिवासी जीवनवास्तव व नाटक या विषयावरील परिसंवादात बोलत होते.
अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रबोधनकर ,लोकशाहीर नाटककार, दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर होते.विचारपीठावर संमेलनाध्यक्ष प्रा. डॉ. विनायक तुमराम, स्वागताध्यक्ष मा. अब्दुल जमीर हकीम, प्राचार्य डॉ. संजय फुलझेले, संयोजक डॉ. राजकुमार मुसणे, रंगभूमी प्रयोग निरीक्षण मंडळ सदस्य तथा नाट्यकलावंत मा. मुकेश गेडाम, नाटककार हरिराम कोटनाके, नाट्य कलावंत विश्वास पुडके, चिदानंद सिडाम, विशाखा कडूकर, लोकेशकुमार, पौर्णिमा तायडे, मनिषा देशपांडे आदीमान्यवर उपस्थित होते.परिसंवादात वक्त्यांनी आदिवासी जीवन वास्तव आणि नाटक या अनुषंगाने विचार व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात लोकप्रिय गायक डॉ. अनिरुद्ध वनकर यांनी घायाळ पाखरा, बिरसा मुंडा, शहीद बाबुराव शेडमाके , का रक्त पिता गरिबाचे या नाटकांच्या आधारे विचार व्यक्त करून आदिवासीचा अस्सल हुंकार, वेदना नाटकातून येणे गरजेचे असल्याचे सांगून श्रोत्यांना अंतर्मुख केले. माझी माय या लोकप्रिय गीत गायनाने डॉ.अनिरुद्ध वनकर यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.कार्यक्रमाचे उत्तम संचालन प्रा. गायत्री खरवडे यांनी तर उपस्थिताचे आभार मुख्य संयोजक डॉ. राजकुमार मुसणे यांनी मानले.















