prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर महापौर निवडणुकीत ठाकरे गटाचा मोठा ट्विस्ट; काँग्रेस-भाजपसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

चंद्रपूर महापौर निवडणुकीत ठाकरे गटाचा मोठा ट्विस्ट; काँग्रेस-भाजपसमोर ठेवली ‘ही’ मोठी अट

0
175

चंद्रपूर: चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत एक नवीन वळण आले आहे. सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेल्या ‘मॅजिक फिगर’ची जुळवाजुळव सुरू असतानाच उद्धव बाळासाहेब ठाकरे (UBT) शिवसेना गटाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “जो आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन राहील,” अशी रोखठोक अट ठाकरे गटाने काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांसमोर ठेवली आहे. यामुळे चंद्रपूरच्या राजकारणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे.

संख्याबळाचे गणित आणि ‘किंगमेकर’ची भूमिका चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी ३४ या ‘मॅजिक फिगर’ची आवश्यकता आहे. सध्याच्या संख्याबळानुसार काँग्रेसकडे ३० नगरसेवक असून त्यांना बहुमतासाठी आणखी ४ सदस्यांची गरज आहे. दुसरीकडे भाजपला सत्तेत येण्यासाठी १० जागांची आवश्यकता आहे.

नुकत्याच झालेल्या घडामोडींमध्ये शिवसेना (उबाठा) आणि वंचित बहुजन आघाडी यांनी एकत्र येत ८ सदस्यांचा एक गट तयार केला आहे. यामध्ये ठाकरे गटाचे ६ आणि वंचितचे २ सदस्य आहेत. त्यामुळे हा ८ सदस्यांचा गट आता सत्ता स्थापनेत ‘किंगमेकर’च्या भूमिकेत आला आहे.

काय आहे ठाकरे गटाची मागणी? शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाप्रमुख संदिप गिऱ्हे यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स’शी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “राज्यस्तरावर महाविकास आघाडी असताना आम्ही प्रत्येक वेळी नमते घेतले आणि अनेक पदांपासून दूर राहिलो. मात्र, आता आमची इच्छा आहे की मनपात शिवसेनेचाच महापौर बसावा. त्यामुळे जो पक्ष आम्हाला महापौरपद देईल, त्यालाच आमचे समर्थन असेल.”

काँग्रेसला सूचक इशारा गिऱ्हे यांनी पुढे सांगितले की, जर काँग्रेसने यावेळी मोठे मन दाखवून आमच्या गटाला साथ दिली, तर त्याचा सकारात्मक परिणाम आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येईल. महापौरपद मिळाल्यास मनपातील इतर पदांसाठी आम्ही फारसा आग्रह धरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

सध्या काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांकडून ठाकरे गटाला समर्थनासाठी विचारणा झाली आहे. मात्र, या अटीमुळे आता हे दोन्ही मोठे पक्ष काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here