
कार्यवाही तत्काळ थांबविण्याची मागणी
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – सिरोंचा – तालुक्यातील नारायणपुर (येर्रागुंठामेथम) येथील काही शेतकरी, नागरिक मागील अनेक वर्षापासून महसूल व वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करुन उदरनिर्वाह करीत आहेत़ अशातच प्रशासनाने सदर अतिक्रमण हटविण्याची नोटीस संबंधितांना बजाविली आहे़ सदर कारवाई अन्यायकारक असून ती तत्काळ थांबवित गावाची शेतजमीनीची महसुल आणि वनविभागाने संयुक्तपणे मोजणीशिवाय कारवाई करु नये,अशी मागणी आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ धर्मराव बाबा आत्राम यांच्या मार्गदर्शनाखाली राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम व राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांच्या नेतृत्वात संबंधित शेतक-यांनी तहसिलदारांमार्फत जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे़.
तालुक्यातील नारायणपुर (येर्रागुंठामेथम) येथील कायमपट्टेधारक आणि अतिक्रमणधारक शेतकऱ्यांची अतिक्रमण हटविण्याच्या कारवाईसंदर्भात महसूल व वनविभागाच्या वतीने संबंधितांना नोटीस बजाविण्यात आले आहे़.मागील अनेक वर्षापासून सदर व्यक्ती शेतजमीन कसून कुटूंबियांचा उदरनिर्वाह करीत आहेत़ उपअधिक्षक भुमीअभिलेख कार्यालयाने या गावातील शेतजमिनीची नकाशानुसार नकाशा व मोजणीची संदर्भाची माहिती पूर्णत: चुकीची दिली आहे़. सध्यपरिस्थितीत नकाशा गृहीत धरुन अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया राबविल्यास अनेक कायमपट्टेधारक आणि अतिक्रमणधारक शेतक-यांवर अन्याय होणार आहे़ महसूल विभाग व वनविभागाने संयुक्तपणे पुर्नमोजणी केल्याशिवाय अतिक्रमण हटविण्याची कार्यवाही करु नये, अशी मागणी तहसिलदार यांचेमार्फत जिल्हाधिका-यांना पाठविलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे़.
यावेळी शिष्टमंडळात राकाँ कार्यकारी जिल्हाध्यक्ष बानय्या जनगाम, राष्ट्रवादी काँग्रेस सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, उपसरपंच सत्यम ठाकूर यांचेसह गंगापात्र ठाकूर, व्येंकटेश ठाकूर, सुरन्ना इंगिली, शंकर ठाकूर, राजन्ना येतम, राजशेखर ठाकूर, गौरया येल्ला, बोंदाला शेंडे, राजन्ना येचेली आदींसह अन्यायग्रस्त शेतकरी व नागरीक उपस्थित होते.















