
प्रा. राजकुमार मुसणे
प्रेमापेक्षाही श्रीमंतीला व जातीला दिलेले अधिक महत्त्व या अनाठायी अट्टाहासामुळे होणारे उदध्वस्थीकरण “जिवलगा घायाळ मी” या नाटकातून प्रत्ययास येते. वर्ग व वर्ण विषमतेची दाहकता दर्शविणारे हे नाटक आहे. प्रेमापेक्षाही वैभवसंपन्नत्तेला अधिक महत्त्व दिल्याने काय होते, हे सुचविणारे नाटक आहे. कलादर्पण नाट्य रंगभूमी वडसा प्रस्तुत प्रा.धनंजय ढवळे लिखित निर्माता परमानंद गहाणे दिग्दर्शित’ जिवलगा घायाळ मी’ संगीत तीन अंकी नाटकाचा प्रयोग दुर्गापूर, चंद्रपूर येथे झाला. अस्सल प्रेम करणाऱ्या प्रेयसी ऐवजी प्रेयसीचे लग्न घरचे श्रीमंत व्यक्तीशी लावून दिल्यामुळे प्रेमभंगाने व्यथित अशा घायाळाची व्यथा म्हणजे हे नाटक आहे. प्रेमभंगामुळे तुटलेल्या मनाची आता शेता दर्शविणारे हे नाटक आहे.
पूजावर प्रेम करणारा मानस आणि पूजाचे प्रसादशी लग्न झाल्यामुळे त्याच्या जीवाची झालेली दैना या नाटकातून दर्शविली आहे. प्रसाद वर प्रेम करणाऱ्या मोहिनीला पूजाचे प्रसादशी झालेले लग्न खटकते.
पूजा मोहिनीला रखेल आणि बदफैली म्हणून अपमानित करते. तिच्या गालावर थापड मारत अवहेलना करते. या अपमानाचा बदला घेण्यासाठी मोहिनी मकरंदकडे असलेली मानस विषयीची चित्रफीत दाखवून पूजाचे तोंड बंद करते.
पूजा मंगळसूत्र त्यागते. मानस तिला समजावतो. मंगळसूत्र संस्कृतीने दिलेला अनमोल दागिना असल्याचे निक्षून सांगतो.मोहिनी भिकारडा म्हणून शंकरचा अपमान करते. मकरंद प्रसादच्या मनात संशयाचे विष कालवून व्यसन करण्यास प्रवृत्त करतो.कोऱ्या चेकवर सह्या घेतो. कंपनीची जागा मोहिनीची असल्याने तिला राहण्यास जागा व २० टक्के उत्पन्न देण्यापेक्षा प्रसादला मोहिनीशी लग्न करण्यास मकरंद प्रवृत्त करतो. संभ्रमित झालेला प्रसादला कृष्णा समजावताच तो शिव्या देत थाप्पड मारून घरातून हाकलतो. व्यसनाच्या आहारी गेलेल्या प्रसादच्या दोन्ही किडन्या निकामी होतात.मानस किडन्या देत जीवदान देतो.लालची, लोभी, धूर्त मकरंद मोहिनीस प्रसादला खिरीत विष देऊन संपविणास सांगतो. मोहिनी आणि मकरंद च्या दुष्कृत्याने संतप्त रंग्या मकरंदला चाकूने वार करून संपवतो. त्याक्षणी मकरंदच्या हातीतील पिस्तुलाची गोळी मोहिनीला लागून एकाचवेळी दुष्कृत्य करणारे दोन्हीही मृत्यू पावतात.
मानस एकीकडे पूजाशी संवाद साधत बंधमुक्त झाल्याची भावना व्यक्त करतो;पण दुसरीकडे आईने गरिबीवर मात करत कष्टाने शिकवल्यानंतरही तिची स्वप्नपूर्ती करू न शकत नाही.ही अपराधी असल्याची तीव्र भावना अंतर्मुख करणारी आहे.
श्रीमंती असते तिथे माणुसकी नसते ही जाणीव प्रकर्षाने हे नाटक करून देते.
पूजावर निरपेक्षपणे प्रेम करणारा, दारिद्र्यावर मात करीत कष्टाने शिक्षण घेत नोकरी मिळविण्यासाठी धडपडणारा, अपयशाने न खचता उमेदीने संघर्ष करणारा, स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणाराहुशार, प्रसंगी प्रेयसीचे इतरांशी लग्न झाल्यामुळे स्वप्नभंग झाल्याने मनोरुग्ण बनलेला, विरह वेदनेने व्याकुळ, प्रसादला किडनी देणारा, सदविचारी मानस (परमानंद गहाणे) द्विधा मनोवृत्तीतील बदलासह, अंगिक व वाचिक अभिनयाने परमानंद गहाणे यांनी उत्तम वटविला.
बहिणीच्या त्यागासाठी ,संसार सुखासाठी , धडपडणारा व प्रसंगी भाऊजीची कानउघडणी करणारा,डिझेल, पेट्रोल, वीज दरवाढीमुळे त्रस्त जनतेची व्यथा उघड करणारा , चलाख मकरंद आणि कपटी मोहिनीला धडा शिकविणारा, वैशिष्ट्यपूर्ण संवादाने रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारा हरहुन्नरी रंग्या (सिनेस्टार सुनील कुकुडकर) स्वार्थी, लालची, आणि लोभी मकरंदची कंपनीमध्ये झालेला अपमान, बदल्याची भावना, कंपनीतील कामगारात असंतोष निर्माण करून कंपनी मालक प्रसाद पणशीकर यांच्याकडून विश्वासघाताने कोऱ्या चेकवर सह्या घेणारा धूर्त, चलाख, प्रसादला व्यसनाच्या आहारी लावत, मोहिनीला भडकावत, शंकरला फूस लावून आपले काम तमाम करणारा हजरजबाबी मकरंद ( किरण कुमार ) यांनी लंगडण्याच्या चालीने , प्रसंगोपात समर्पक म्हणीयुक्त बोलण्याच्या लकबीतील वैशिष्ट्यपूर्ण अभिनय व देहबोलीमुळे जबरदस्त साकारत नाटकात रंगत आणली. स्वतःला राष्ट्रसंताचा पाईक समजणारा परंतु आपल्या सोयीनुसार आचरण असणारा, जातीय विषमतेचे वर्तन करणारा कन्फ्युज कणाहीन बेगडी बाप शंकर (नागेश मोहुर्ले ), राधावर प्रेम करणारा, प्रसाद मालकाचा प्रामाणिक नोकर , खट्याळ वृत्तीचा कृष्णा (जय वावरे),मानसवर प्रेम करणारी परंतु वडिलांच्या आग्रहाखातर प्रसादशी लग्न करणारी संभ्रमित पूजा (प्रतिक्षा), नृत्य पारंगत , प्रसादवर प्रेम करणारी परंतु प्रसादचे पूजाशी लग्न झाल्यामुळे प्रसाद हिरावला गेल्याचे शल्य बोचणारी, प्रसाद हवा यासाठी वाटेल ते करण्यासाठी तयार असलेली कटकारस्थानी मोहिनी (पूजा मून ), कृष्णावर प्रेम करणारी मिस्कील वृत्तीची राधा (प्रिया श्रीरामे) लोकांची धुणी – भांडी करून स्वकष्टाने मुलाला शिकवणाऱ्या आणि पदभरतीची लिस्ट कॅन्सल झाल्यामुळे हताशतेंने आत्महत्येचा विचार करणाऱ्या मुलाला आत्महत्यापासून परावृत्त करणारी समर्पित माता मीरा. (प्रतिभा अहेर) या पात्रांच्या समन्वयातून नाट्य उलगडते.
नाटकातील विनोद प्रेक्षकांना खुर्चीवर खिळवून ठेवणार आहे. लालची तोताराम, राधावर प्रेम करणारा कृष्णा यांच्यातील विलक्षण केमेस्ट्री व उघडेनाथ बाबाचे भूत,कारनामे,भक्ताचे बिमारी दूर करण्याचे विविध उपाय आणि के. रविकुमार, जय वावरे, प्रिया श्रीरामे यांच्यातील मिश्किल जुगलबंदी यामुळे प्रेक्षक मस्त हसतात. उठा उठा सकळजन ही भूपाळी, राष्ट्रसंतांचे भेदभाव कशाला माणसा माणसात हे भजन, अंधार सोसून, गोरी गोरी पान तू, तुझे रूप गोजिरवाणे, तुझ्यात हा जीव गुंतला यासारखी श्रवणीय गीते व पार्श्वगायक व आर्गन वादक प्रलय बोरकर, अँक्टोपॅड राजू कुंभरे ,तबला प्रशांत उईकें यांची उत्तम संगीत साथ तसेच कुंदन शेंडे, प्रमोद राऊत यांच्या प्रयोग सहाय्यामुळे नाट्य प्रयोगात रंगत आली.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा भक्त असलेला शंकर’ भेदभाव कशाला माणसा माणसात रे’ म्हणतो आणि संत महात्म्याच्या विचारांना झुगारून पैशाला महत्व देत मुलींच्या भावना लक्षात न घेता स्वतःच उच्चवर्णीय श्रीमंतांशी आपल्या मुलीचे बिनदिक्कतपणे लग्न करून देतो. अर्थातच कणाहीन बापाच्या मनोवृत्तीच्या छटा दर्शवणारे आणि मुलीचे आयुष्य पणाला लावणारे हे नाटक आहे.तद्वतच अहर्निश परिश्रम घेऊन वाढविलेल्या आईशी प्रतारणा करणारा आणि पूजा या प्रेयसीच्या प्रेमात पागल होणारा मानस हे दोन्ही पात्र विसंगतवृत्तीचे निदर्शक वाटतात. किंबहुना मानसचे पूजावर प्रेम, पूजाचे प्रसादशी लग्न, प्रसादवर मोनिकाचे प्रेम अन् प्रसादची त्रिशंकू अवस्था अशा भिन्न प्रवृत्तीचे दिशादर्शन नाटकातून घडते.
मानसचे अस्सल प्रेम, पूजाची द्विधावस्था, प्रसादचा भाबडेपणा , मोहिनीचे कट- कारस्थान, हजरजबाबी
मकरंदचे धूर्त चातुर्य, लोभी तोताराम, प्रामाणिक कृष्णा, कष्टाळू मीरा,सदाबहार राधा आणि ग्रामीण ढंगाच्या झाडीबोलीतून वैशिष्ट्यपूर्ण बोलणाऱ्या रंग्याचा रांगडेपणा आणि तोताराम – कृष्णा- राधा यांची भन्नाट जुगलबंदीची कॉमेडी अनुभवण्यासाठी हे नाटक पाहायला हवे.
प्रेम, जातीय विषमता,पदभरती घोटाळा, वशिलेबाजी, राजकारण्यांचा शिरकाव, लाच घेऊन थेट नियुक्ती, पात्र उमेदवारांना ऐनवेळी डावलने, गावात काम नसल्यामुळे तेलंगणात रंग्याला जावं लागणे या माध्यमातून कामगारांचे स्थलांतरण , पारंपारिक व्यवसाय डबघाईला जात असल्याचे तथा बापाचा दुटप्पीपणा अशा विदारक घडामोडीच्या सूचकतेमुळे नाटक वास्तविक दर्शनाने प्रेक्षकांना आवडले. उत्तम पाठांतर, गतिमानता, पात्राला साजेसे नेपथ्य , कलावंतांचा प्रभावी अभिनय, शांत रसिक प्रेक्षकांचा हाउसफुल्ल प्रतिसाद आणि प्रयोगाकरिता एकसंधता साधण्यात दिग्दर्शक परमानंद गहाणे यांना मिळालेले यश यामुळे प्रयोग सरस ठरला.लालच, क्रोध आणि संशय यामुळे आयुष्य उद्ध्वस्त होते. जात, पैसा यापेक्षा प्रेमाला प्राधान्य द्यायला हवे,हा आशय दर्शविण्यात नाटककार व कलावंत यशस्वी ठरले.
प्रा. राजकुमार मुसणे















