
उज्वला नगराळे महिला जिल्हा संपादिका चंद्रपूर – मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आधुनिक युगात खेळाचे महत्व कमी होत चालले आहे. परंतु खेळ आपल्याला शिस्त आणि चिकाटी शिकवतो म्हणूनच प्रत्येक विद्यार्थ्याने कोणत्या ना कोणत्या खेळात सहभाग घेतला पाहिजे. मोबाईलमध्ये अडकून न पडता निरोगी आयुष्यासाठी अभ्यासाबरोबर खेळायचाही छंद जोपासला पाहिजे असे आवाहन आजपासून ब्रम्हपुरी येथे सुरू झालेल्या क्रीडा महोत्सवात केले.
ब्रम्हपूरी स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने शहरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर ब्रम्हपूरी क्रिडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी उद्घाटक म्हणून उपस्थित राहिलो.

यावेळी मंचावर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. लक्ष्मीकांत लाडुकर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून माजी प्राचार्य डॉ.एन.एस. कोकोडे, माजी प्राचार्य डॉ.देविदास जगनाडे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खेमराज तिडके, न.प.उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती डॉ.नितीन उराडे, माजी प्राचार्य भाऊराव राऊत, डॉ.नरेंद्रसिंग चव्हाण, नगरसेवक राकेश पडोळे, नगरसेवक पुष्पाकर बांगरे, शहर काँग्रेस कार्याध्यक्ष सुधाकर पोपटे, जिल्हा काँग्रेस सहसचिव गाजी पटेल, माजी न.प.उपाध्यक्ष कृष्णा भाईक यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते.

ब्रम्हपूरी शहर हे विद्येचे माहेरघर म्हणून सर्वदूर परिचित असून क्रिडानगरी म्हणून देखील आता नावलौकिक वाढत आहे. या शहरात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत म्हणून येथे कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करून घेत क्रिडा संकुल व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पटांगणावर विविध खेळांची मैदाने तयार केली जात आहेत. खेळ हे केवळ शारीरिक व्यायाम नसून ते व्यक्तिमत्त्व घडवणारे माध्यम आहे. मैदानात जिंकल्यामुळे आत्मविश्वास वाढतो, तर हरल्यामुळे पराभव पचवण्याची आणि पुन्हा प्रयत्न करण्याची जिद्द शिकायला मिळते. क्रिकेट, फुटबॉल, खो-खो, धावणे यांसारख्या खेळांमधून आपल्याला संघकार्य आणि नेतृत्वाचे गुण आत्मसात करता येतात.
आजचा दिवस केवळ पदके किंवा ट्रॉफी जिंकण्याचा नाही, तर खिलाडूवृत्ती दाखवण्याचा आहे. प्रत्येक खेळाडूंनी नियमांचे पालन करून, प्रामाणिकपणे खेळ खेळणे गरजेचे आहे. आपण सर्वजण एकमेकांचे कौतुक करू आणि या ब्रम्हपूरी क्रीडा महोत्सवाचा आनंद घेऊया.















