prabodhini news logo
Home गोवा नेपाळमध्ये गोव्याच्या सुपुत्रीचा डंका; प्रसिद्ध लेखिका पूर्णिमा देसाई यांना ‘मातृभाषा रत्न मानद’...

नेपाळमध्ये गोव्याच्या सुपुत्रीचा डंका; प्रसिद्ध लेखिका पूर्णिमा देसाई यांना ‘मातृभाषा रत्न मानद’ उपाधीने सन्मानित

0
446

नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – काठमांडू (नेपाळ): आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाचे औचित्य साधून नेपाळची प्रसिद्ध संस्था ‘शब्द प्रतिभा बहुक्षेत्रीय सन्मान फाउंडेशन’ तर्फे गोव्याच्या नामवंत लेखिका आणि कवयित्री पूर्णिमा देसाई यांना ‘मातृभाषा रत्न मानद’ या प्रतिष्ठित उपाधीने गौरवण्यात आले. नेपाळ-भारत मैत्री विकास, देवनागरी लिपीचे संरक्षण आणि हिंदी-नेपाळी भाषेच्या जागतिक प्रचारासाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला.
काठमांडू येथे आयोजित या विशेष सोहळ्यात भारत, नेपाळ आणि इतर पाच देशांतील सुमारे १००० प्रतिभावंत साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर कवी, लेखक आणि शिक्षकांना प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने या महाकुंभाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये पौर्णिमा देसाई यांच्या साहित्यिक प्रवासाची विशेष दखल घेण्यात आली.

साहित्यिक कारकीर्द आणि बहुभाषिक झेप

पूर्णिमा देसाई यांनी आजवर गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारात दर्जेदार साहित्यनिर्मिती केली आहे. त्यांचे ‘एक तारा’, ‘चैत्र पौर्णिमा’ आणि ‘वसंत बहार’ हे तीन मराठी कवितासंग्रह वाचकप्रिय ठरले आहेत. केवळ मराठीच नव्हे, तर इंग्रजी काव्यातही त्यांनी आपली छाप पाडली आहे. त्यांच्या या काव्यसेवेचा गौरव म्हणून आतापर्यंत त्यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

जागतिक मराठी संमेलनात विशेष उपस्थिती

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात दोनदा ‘निमंत्रित कवी’ म्हणून मान मिळवणाऱ्या देसाई यांनी नुकतीच नाशिक येथे पार पडलेल्या चौथ्या विश्व मराठी संमेलनात विशेष निमंत्रित प्रतिनिधी म्हणून उपस्थिती लावली. आपल्या ‘हसत खेळत काव्य’ या व्यासपीठामार्फत त्यांनी मराठी साहित्याचा प्रसार जागतिक पातळीवर केला आहे.

स्वरपूर्णिमा: संगीतमय प्रवास

साहित्यासोबतच संगीत क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. त्यांच्या गीतांवर आधारित ‘स्वरपूर्णिम’ हा ऑडिओ आणि व्हिडिओ अल्बम प्रदर्शित झाला असून, ही गीते पुणेरी ८९.६ रेडिओवर प्रसारित झाली आहेत. प्रसिद्ध संगीतकार अजय नाईक यांनी संगीतबद्ध केलेली ही गाणी जान्हवी प्रभू अरोरा, राजवी नाईक यांसारख्या दिग्गज गायिकांनी गायली आहेत.
नेपाळमध्ये मिळालेल्या या आंतरराष्ट्रीय सन्मानामुळे गोव्याच्या आणि महाराष्ट्राच्या साहित्य वर्तुळातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here