prabodhini news logo
Home ठळक बातम्या तिवसा तहसीलवर भाकरी-कांदा’ मोर्चा: गॅस टंचाईमुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक, तहसीलदारांना भाकरी...

तिवसा तहसीलवर भाकरी-कांदा’ मोर्चा: गॅस टंचाईमुळे वंचित बहुजन आघाडी आक्रमक, तहसीलदारांना भाकरी व कांदा भेट!

0
70

तिवसा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज – राज्यात निर्माण झालेल्या गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी तर्फे तिवसा तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आले. आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी बनवून प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला तसेच तहसीलदारांना भाकरी व कांदा भेट देत शासनाविरोधात निषेध नोंदविला.

“नरेंदर, कब मिलेगा सिलेंडर?” अशा आक्रोशपूर्ण घोषणांनी परिसर दणाणून गेला. काही दिवसांपूर्वी गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असताना माजी सरपंच शंकरराव शिरसाट यांचा मृत्यू झाला होता. तसेच अमरावती जिल्ह्यातील रिद्धपूर येथेही अशाच प्रकारची दुर्दैवी घटना घडल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

गॅसच्या तुटवड्यामुळे घरगुती स्वयंपाक ठप्प झाला असून चहाच्या टपऱ्या, छोटे व्यावसायिक यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. मेसमध्ये गॅस उपलब्ध नसल्याने अनेक विद्यार्थी शहरातून गावी परतले आहेत. दरम्यान, काही ठिकाणी सिलेंडरची वाढीव दराने विक्री होत असल्याने नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडत आहे.

या पार्श्वभूमीवर ॲड. बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यव्यापी आंदोलनाची हाक दिली होती. त्यास प्रतिसाद देत तिवसा तालुका वंचित बहुजन आघाडीने हे आंदोलन उभारले.
यावेळी युवा आघाडीचे जिल्हा महासचिव सागर भवते यांनी नायब तहसीलदारांकडे निवेदन देत तालुक्यातील गॅस टंचाई आणि काळाबाजार तात्काळ थांबवण्याची मागणी केली. अन्यथा सिलेंडर गोडाऊनसमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला.

आंदोलनात जिल्हा उपाध्यक्ष दादाराव गडलिंग, प्रमोद मुंद्रे, विनोद खाकसे, मुस्ताक शहा, डॉ. धर्मेंद्र दवाले, सिद्धार्थ कटरने, प्रवीण निकाळजे, अनिल सोनोने, नितीन थोरात यांसह महिला व युवा आघाडीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here