prabodhini news logo
Home एटापल्ली उडेरा येथील दलित वस्तीमध्ये रस्ता-नालीसाठी भाकपाची मागणी

उडेरा येथील दलित वस्तीमध्ये रस्ता-नालीसाठी भाकपाची मागणी

0
12

एटापल्ली प्रतिनिधी : तालुक्यातील ग्रामपंचायत उडेरा येथील बापू कंबलवार यांच्या घरापासून शंकर नक्कलवार यांच्या घरापर्यंतचा परिसर हा दलित वंचित नागरिकांचा वस्तीभाग असून, या भागात आजपर्यंत पक्का रस्ता व नालीची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे स्थानिक नागरिकांना विशेषतः पावसाळ्यात मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

सदर भाग उतारावर असल्यामुळे गावातील पावसाचे पाणी थेट या वस्तीमध्ये वाहून येते व अनेकदा नागरिकांच्या घरात शिरते. यामुळे दलित वंचित कुटुंबांना मोठा त्रास सहन करावा लागत असून, लहान मुलांपासून महिलांपर्यंत सर्वांनाच आरोग्याच्या गंभीर समस्यांना सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचे प्रदूषण, चिखल, डास यामुळे आजारांचा धोका वाढला आहे.

सदर गाव हे खान प्रभावित क्षेत्रात येत असल्याने जिल्हा खनिकर्म निधी (DMF) अंतर्गत या भागातील मूलभूत सुविधा तातडीने पूर्ण करणे आवश्यक असल्याची मागणी करण्यात येत आहे.

या संदर्भात भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) चे जिल्हा सहसचिव कॉ. सचिन मोतकुरवार व जिल्हा सदस्य कॉ. सुरज जककुलवार यांनी प्रशासनाकडे बापू कंबलवार ते शंकर नक्कलवार यांच्या घरापर्यंत तात्काळ पक्का रस्ता व नाली बांधकाम मंजूर करण्याची मागणी केली आहे.

याबाबत बोलताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “उडेरा येथील दलित वंचित नागरिकांची ही समस्या केवळ रस्ता-नालीची नसून त्यांच्या जगण्याच्या मूलभूत हक्कांशी संबंधित आहे. पावसाळ्यात घरात पाणी शिरणे ही अत्यंत गंभीर बाब असून प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. भाकपा नेहमीच दलित व वंचितांच्या हक्कांसाठी लढत आली आहे आणि पुढेही त्यांच्या प्रत्येक समस्येत ठामपणे सोबत उभी राहील. जर प्रशासनाने लवकरात लवकर काम मंजूर केले नाही, तर भाकपा तीव्र आंदोलन उभारेल आणि नागरिकांना न्याय मिळवून देईल.”

भाकपाच्या वतीने दलित वंचित नागरिकांना पूर्ण मदत व पाठिंबा देण्याचे आश्वासन देण्यात आले असून, सदर काम तातडीने मंजूर करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here