prabodhini news logo
Home ठळक बातम्या मीरा-भाईंदरमध्ये मोठा औषध घोटाळा उघड

मीरा-भाईंदरमध्ये मोठा औषध घोटाळा उघड

0
45

टेंबा रुग्णालयात १.६५ कोटींची एक्स्पायरी औषधे; मंत्री प्रताप सरनाईक यांची धाड

मीरा-भाईंदर २४ एप्रिल २०२६ : भाईंदर पश्चिम येथील पंडित भीमसेन जोशी (टेंबा) रुग्णालयात तब्बल १ कोटी ६५ लाख रुपयांच्या एक्स्पायरी औषधांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अचानक पाहणीदरम्यान हा गंभीर प्रकार समोर आला.

दररोज सुमारे ५०० ते ६०० रुग्णांवर उपचार करणाऱ्या आणि २५० बेड क्षमतेच्या या महत्त्वाच्या रुग्णालयात अनेक मूलभूत सुविधांची कमतरता असल्याचेही निरीक्षणात आढळले.

४८ तासांत एक्स्पायर होणारी औषधे रुग्णालयात
२७ मार्च २०२६ रोजी ‘सक्षम फाउंडेशन’मार्फत रुग्णालयात १.६५ कोटींची औषधे देण्यात आली होती. मात्र, या औषधांची एक्सपायरी तारीख ३० मार्च असल्याने अवघ्या ४८ तासांचा कालावधी शिल्लक असताना ती रुग्णालयात आणण्यात आली होती. विशेष म्हणजे ही औषधे रुग्णालयाने मागवलेली नव्हती.

रुग्णालय प्रशासनाने सतर्कता दाखवत या औषधांची तपासणी केली आणि ती स्वीकारण्यास नकार देत संबंधित संस्थेला अधिकृत पत्र पाठवले. त्यामुळे संभाव्य मोठा अनर्थ टळला.

राजकीय दबावाचा आरोप
या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत व दबावाखाली औषधे स्वीकारण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप समोर आला आहे. संबंधित कार्यक्रमात आमदार नरेंद्र मेहता, महापौर डिंपल मेहता आणि उपमहापौर ध्रुवकिशोर पाटील उपस्थित होते. उपमहापौरांच्या ओळखीच्या संस्थेमार्फत हा कार्यक्रम झाल्याची माहिती पुढे आली आहे.

“दोषींना सोडणार नाही” – मंत्री सरनाईक
या प्रकारावर संताप व्यक्त करत मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले,
“गोरगरीब जनतेच्या जीवाशी खेळणाऱ्यांना माफी नाही. केवळ प्रसिद्धीसाठी एक्स्पायरीच्या उंबरठ्यावर असलेली औषधे देणे हा घृणास्पद प्रकार आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल.”

त्यांनी प्रशासनाला तत्काळ पंचनामा करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले. तसेच PWD विभागामार्फत रुग्णालयाची सखोल चौकशी करण्याचे निर्देशही दिले आहेत.

प्रशासन सतर्क
या पाहणीवेळी मीरा-भाईंदर महानगरपालिका आयुक्त राधाबिनोद शर्मा, रुग्णालय व्यवस्थापक जाफर तडवी तसेच PWD अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक यांच्या कारवाईमुळे रुग्णालयातील त्रुटींवर प्रकाश पडला असून, आगामी काळात आरोग्य व्यवस्थेत सुधारणा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

मोजीस परमार
विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे
प्रबोधिनी न्यूज नेटवर्क
mojissports@gmail.com
8104170564

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here