
सिरोंचा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : तालुक्यातील ग्रामपंचायत जाफराबाद येथील आशा सेविकांना कोरोना काळातील थकीत मानधन तात्काळ अदा करण्यात यावे, या मागणीसाठी भाकपा पक्षाच्या वतीने तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यात आले.
कोरोना महामारीच्या काळात आशा सेविकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून गावोगावी जाऊन सर्वेक्षण, तपासणी, लसीकरण मोहिम, रुग्ण शोध मोहीम व जनजागृती आदी महत्त्वाची कामे प्रामाणिकपणे पार पाडली. आरोग्य यंत्रणेचा कणा म्हणून त्यांनी मोलाचे योगदान दिले. मात्र, आजपर्यंत अनेक आशा सेविकांना त्यांच्या कामाचे मानधन / प्रोत्साहनपर रक्कम पूर्णपणे मिळालेली नसल्याची बाब निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
ही रक्कम तात्काळ मंजूर करून संबंधित आशा सेविकांच्या खात्यात जमा करण्यात यावी, तसेच संबंधित विभागास आवश्यक त्या सूचना देऊन त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.
हे निवेदन गडचिरोली जिल्हा सचिव कॉ. सचिन मोतकुरवार (भाकपा) यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रवि बारसागंडी, तालुका सचिव भाकपा सिरोंचा यांच्या नेतृत्वात सादर करण्यात आले. कॉ. सुरज जककुलवार व परिसरातील आशा सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “कोरोना काळात आशा सेविकांनी जीवाची पर्वा न करता जनतेसाठी अहोरात्र काम केले. शासनाने जाहीर केलेले मानधन आजपर्यंत न देणे ही अन्यायकारक बाब आहे. आशा सेविकांना त्यांच्या हक्काचे पैसे तात्काळ मिळाले पाहिजेत, अन्यथा भाकपा पक्षाच्या वतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल.”
याप्रकरणी लवकरात लवकर कार्यवाही न झाल्यास पुढील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
















