prabodhini news logo
Home ठळक बातम्या शिवरायांच्या पुतळ्याआड सत्तेचा बाजार! काशिमीऱ्याचा स्वाभिमान शॉपिंग मॉलसाठी गहाण ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव!

शिवरायांच्या पुतळ्याआड सत्तेचा बाजार! काशिमीऱ्याचा स्वाभिमान शॉपिंग मॉलसाठी गहाण ठेवण्याचा सत्ताधाऱ्यांचा डाव!

0
37

मंत्री प्रताप सरनाईक यांचा ‘हायव्होल्टेज’ गौप्यस्फोट!

मीरा-भाईंदर : काशिमीरा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पुतळ्याच्या स्थलांतराच्या मुद्द्यावरून मीरा-भाईंदरचे राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आयोजित पत्रकार परिषदेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्हा पालकमंत्री मा.ना.श्री. प्रताप इंदिराबाई बाबुराव सरनाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर आणि आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर गंभीर आरोप करत ‘व्यापारीकरणाच्या राजकारणा’चा पर्दाफाश केला.
“मी राज्याचा मंत्री नंतर, आधी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. महाराजांच्या पुतळ्याचा अडथळा दूर करून त्या ठिकाणी शॉपिंग मॉल उभारण्याचा डाव रचणाऱ्यांचे मनसुबे कधीही पूर्ण होऊ देणार नाही,” असा इशारा देत मंत्री प्रताप सरनाईक यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.
पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये पालिकेत नरेंद्र मेहता यांची सत्ता असताना पुतळ्याच्या दोन्ही बाजूच्या मोक्याच्या पालिका भूखंडावर शॉपिंग मॉल उभारण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. मात्र, महाराजांचा विद्यमान पुतळा या प्रकल्पात अडथळा ठरत असल्याने तो शहराबाहेरील जे.पी. इन्फ्रा परिसरात हलवण्याचा गुप्त प्रस्ताव आणण्यात आला होता.
सरनाईक यांनी यावेळी शासनाचा जीआर, जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेले प्रतिज्ञापत्र आणि संबंधित पत्रव्यवहार माध्यमांसमोर सादर करत, “दोन किलोमीटरच्या परिघात दुसरा पुतळा उभारता येत नाही,” हा शासन नियम असल्याचे स्पष्ट केले. तरीदेखील नवीन पुतळ्याचे राजकारण करत जुना पुतळा हटवण्याचा कट रचला गेला, असा आरोप त्यांनी केला.
“महासभेच्या विषयपत्रिकेत एका बाजूला शॉपिंग मॉलचे विषय आणि दुसऱ्या बाजूला पुतळा स्थलांतराचा विषय घेण्यात आला. यावरूनच सत्ताधाऱ्यांचा उद्देश लोकसेवा नसून शहराचे व्यापारीकरण करणे हा आहे,” असा घणाघात मंत्री सरनाईक यांनी केला.
शिवप्रेमींच्या भावना दुखावणाऱ्या या प्रकाराचा निषेध करत त्यांनी स्पष्ट शब्दांत इशारा दिला की, “आज महाराजांचा पुतळा हलवताय, उद्या भूमिपुत्र आणि मराठी माणसालाच शहराबाहेर काढाल. हा विश्वासघात मीरा-भाईंदरची जनता कधीही विसरणार नाही.”
सोबतच त्यांनी आश्वासन दिले की, “जोपर्यंत मी या शहराचा लोकप्रतिनिधी आहे, तोपर्यंत काशिमीऱ्याच्या पुतळ्याला कुणी धक्काही लावू शकणार नाही. पालिकेकडे निधी नसेल, तर स्वखर्चाने किंवा आमदार निधीतून त्या ठिकाणी भव्य सुशोभीकरण आणि सर्वांत उंच पुतळा उभारून दाखवेन.”

*मोजीस परमार*
*विशेष जिल्हा प्रतिनिधी, ठाणे*
*प्रबोधिनी न्यूज नेटवर्क*
*mojissports@gmail.com*
*8104170564*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here