
ब्रह्मपुरी प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. १७ मे २०२६ रोजी रविवारी स्वर्गीय राजीव गांधी कृषी तंत्र विद्यालय चौगान येथेआयोजित करण्यात आलेला माजी विद्यार्थी व शिक्षकांचा स्नेहमिलन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. तब्बल २१ वर्षानंतर एकत्र आलेल्या वर्गमित्रांनी जुन्या आठवणींना उजाळा देत आनंदोत्सव साजरा केला. या स्नेहमेळाव्यात माजी विद्यार्थी, शिक्षक, कुटुंबीय तसेच विविध क्षेत्रात कार्यरत असलेले माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राध्यापक फुलझले होते, तर उपाध्यक्ष म्हणून प्राध्यापक काथोडे यांनी उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाचे उद्घाटन माजी प्राचार्य दिवे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून नवलाजी दोनाडकर व मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. त्यानंतर उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. प्रास्ताविकामध्ये श्री दिगांबर मैंद यांनी स्नेहमिलन सोहळ्याचे उद्दिष्ट सांगताना, “जुने मित्र, शिक्षक आणि आठवणी यांना पुन्हा एकत्र आणणे हा या कार्यक्रमामागील मुख्य हेतू आहे,” असे नमूद केले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुनिल पिसे यांनी अतिशय प्रभावी व विनोदी शैलीत केले. विविध आठवणी, शालेय जीवनातील किस्से आणि शिक्षकांविषयीच्या भावना व्यक्त करताना अनेक माजी विद्यार्थी भावूक झाले. उपस्थित शिक्षकांनीही विद्यार्थ्यांच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी स्वर्गीय माजी विद्यार्थी अजय पिलारे व राहूल चहांदे यांच्या स्मृतींना अभिवादन करण्यात आले. त्यांच्या कुटुंबीयांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. श्रीमती पिलारे मॅडम व चहांदे माजी विद्यार्थीनी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी उपस्थितांनी दिवंगत मित्रांच्या आठवणींना उजाळा देत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
स्नेहमिलन सोहळ्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम, गप्पा, जुन्या फोटोंचे प्रदर्शन तसेच सामूहिक भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. २१ वर्षांनंतर भेटलेल्या मित्रांनी पुन्हा अशाच पद्धतीने नियमित स्नेहमेळावे आयोजित करण्याचा निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व मान्यवर, शिक्षक व माजी विद्यार्थ्यांचे आभार मानण्यात आले. आनंद, उत्साह आणि जुन्या आठवणींनी भरलेला हा स्नेहमिलन सोहळा सर्वांच्या कायम स्मरणात राहणारा ठरला.















