prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूरच्या चिमुकल्या अधीर जुन्नावारची राज्यभर दखल;पुण्यात रौप्यपदक पटकावत RSFI मध्ये निवड

चंद्रपूरच्या चिमुकल्या अधीर जुन्नावारची राज्यभर दखल;पुण्यात रौप्यपदक पटकावत RSFI मध्ये निवड

0
39

ऑलिम्पिकच्या दिशेने टाकले पहिले पाऊल..

प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्युज चंद्रपूर – पुणे येथील एल.एक्स.टी. (LXT) राहुल राणे इंटरनॅशनल स्केटिंग बँकेड ट्रॅकवर राज्यस्तरीय स्केटिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. राज्यातील विविध नामांकित क्लब व उत्कृष्ट खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता.
या स्पर्धेमध्ये अंडर-6 वयोगटात इनलाईन प्रोफेशनल स्केटिंग प्रकारात अतिशय चुरशीच्या फेऱ्या पार पडल्या. प्रथम फेरीत 7 स्पर्धक तर दुसऱ्या फेरीत 7 स्पर्धकांनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले. या दोन्ही फेऱ्यांमधून उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 स्पर्धकांची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. अंतिम फेरीत चंद्रपूर जिल्ह्यातील (SSKM) श्री शंकर क्रीडा मंडळाचा खेळाडू अधीर जुन्नावार याने वेगवान आणि संतुलित खेळ करत द्वितीय क्रमांक पटकावला व रौप्यपदकावर आपले नाव कोरले.
अधीर जुन्नावार हा प्रशिक्षक विनोद निखाडे यांच्या मार्गदर्शनाखाली इनलाईन प्रोफेशनल स्केटिंगचा सराव करत असून अल्पवयातच त्याने राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी नोंदवली आहे. या यशामुळे त्याची शासनमान्य राष्ट्रीय संघटना रोलर स्केटिंग फेडरेशन ऑफ इंडिया (RSFI) मध्ये निवड झाली आहे.
विशेष म्हणजे भविष्यात राष्ट्रीय तसेच ऑलिम्पिकसारख्या आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी RSFI या राष्ट्रीय संघटनेच्या माध्यमातूनच खेळाडूंना संधी उपलब्ध होत असते. 2036 मध्ये भारतात होऊ घातलेल्या ऑलिम्पिक स्पर्धांच्या पार्श्वभूमीवर अधीर जुन्नावारची RSFI मध्ये झालेली निवड ही त्याच्या उज्ज्वल क्रीडा भविष्यासाठी मोठी पायरी मानली जात आहे.
अल्पवयातच मिळविलेल्या या यशामुळे चंद्रपूर जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून अधीरवर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी त्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here