prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपूर-गडचिरोलीत विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप

चंद्रपूर-गडचिरोलीत विधान परिषद निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप

0
38

काँग्रेसच्या २३ नगरसेवकांना ५ लाखांचे आमिष देऊन पळवल्याचा विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक आरोप

चंद्रपूर/नागपूर प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – २६ मे २०२६:आगामी स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पूर्व विदर्भातील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे २३ नगरसेवक अचानक ‘नॉट रिचेबल’ झाले असून, भाजपने त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपयांचा ॲडव्हान्स देऊन अज्ञातस्थळी पळवून नेल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. निवडणुकीचा बिगुल वाजताच विदर्भात मोठ्या प्रमाणावर ‘घोडेबाजार’ सुरू झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.

नेमका प्रकार काय?

विधान परिषद निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेले नाहीत. असे असतानाच, काँग्रेसचे २३ नगरसेवक अचानक गायब झाले आहेत. हे सर्व लोकप्रतिनिधी भाजपचे चिमूरचे आमदार बंटी भांगडिया यांच्या थेट संपर्कात असून त्यांना मत फुटू नये म्हणून तातडीने राज्याबाहेर किंवा अज्ञात सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. विजय वडेट्टीवार यांच्या स्वतःच्या बालेकिल्ल्यातच भाजपने ही मोठी गुप्त मोहीम फत्ते केल्याने काँग्रेस छावणीत प्रचंड अस्वस्थता पसरली आहे.

एका मतासाठी १५ लाखांचा रेट;

वडेट्टीवारांचे टीकास्त्रया धक्कादायक घडामोडींवर नागपूर येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना विजय वडेट्टीवार अत्यंत आक्रमक झाले. त्यांनी सत्ताधारी भाजपवर ‘धनशक्तीचा’ गैरवापर केल्याचा थेट आरोप केला. वडेट्टीवार म्हणाले:

“माझ्या माहितीनुसार, ५-५ लाख रुपये देऊन नगरसेवकांना उचलण्याचे काम भाजपने केले आहे. आता तर एका मताचा रेट थेट १५ लाख रुपयांवर उघडला गेला आहे. जर एका मतासाठी १५-१५ लाख रुपये दिले जात असतील, तर ही निवडणूक जवळपास १०० कोटींच्या घरात जाईल. सत्ता आणि पैशाच्या मस्तीत मग्रूर झालेल्या भाजपने महाराष्ट्रात लोकशाहीचा लिलाव मांडला आहे. राजकारण आणि समाजसेवा आता पूर्णपणे कंत्राटदार आणि उद्योगपतींच्या हातात गेली आहे.”

व्हीप झुगारणाऱ्यांवर होणार कडक कारवाई

अज्ञातस्थळी गेलेल्या नगरसेवकांना विजय वडेट्टीवार यांनी कडक शब्दांत इशारा दिला आहे. जे नगरसेवक पक्षाचा व्हीप झुगारून गेले आहेत, ते परत आल्यानंतर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यांचे नगरसेवकपद रद्द केले जाईल आणि पुढील ६ वर्षांसाठी त्यांना निवडणूक लढण्यास अपात्र ठरवले जाईल, असे वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले.

भाजपची प्रतिक्रिया

दुसरीकडे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या आरोपांवर पलटवार केला आहे. काँग्रेसचे नगरसेवक कुठे गेले, याबद्दल त्यांच्याच पक्षाच्या नेत्यांनी विचार करावा. स्वतःचे घर सांभाळता येत नसल्याने विरोधकांकडून असे बिनबुडाचे आरोप केले जात आहेत, अशी भूमिका भाजप नेत्यांनी मांडली आहे.या नाट्यमय घडामोडींमुळे पूर्व विदर्भातील विधान परिषदेची आगामी लढाई अत्यंत चुरशीची आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रतिष्ठेची बनली आहे. काँग्रेस आता हे ‘डॅमेज कंट्रोल’ कसे करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here