
सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर भर; राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा
गडचिरोली प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज नेटवर्क – दि. 26 : राष्ट्रीय तंबाखू विरोधी दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली येथे राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत जिल्हा समन्वय समितीची आढावा सभा प्रभारी जिल्हाधिकारी नितीन गावंडे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली. यावेळी शालेय मुलांमध्ये वाढत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनाबाबत गंभीर चिंता व्यक्त करण्यात आली.
सभेत शालेय स्तरावर तंबाखूमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी विविध जनजागृती व प्रतिबंधात्मक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना शिक्षण विभागाला देण्यात आल्या. तसेच शाळा व सर्व शासकीय कार्यालयांच्या १०० यार्ड परिसरात तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश संबंधित यंत्रणांना देण्यात आले.
यावेळी सर्व शासकीय कार्यालये तंबाखूमुक्त करण्यावर विशेष भर देण्यात आला. प्रत्येक विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालय परिसरात तंबाखूमुक्त वातावरण राखण्यासाठी आवश्यक ती दक्षता घ्यावी तसेच नियमांचे काटेकोर पालन सुनिश्चित करावे, अशा सूचना श्री गावंडे यांनी दिल्या.
सभेत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. जनजागृती मोहीम, शैक्षणिक संस्थांमधील उपक्रम, तंबाखूजन्य पदार्थ विक्रीवरील नियंत्रण तसेच विविध विभागांमधील समन्वय याबाबत चर्चा करण्यात आली.
या बैठकीस समितीच्या सचिव तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा लहाडे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कोटुले, गोंडवाना विद्यापीठाचे कुलसचिव अनिल हिरेखन, पोलीस अधीक्षक कार्यालयातील पीडी (एलसीबी) अरुण फेंगडे, जिल्हा सल्लागार (NTCP) डॉ. प्रेरणा राऊत, अन्न व औषध प्रशासन विभागाचे श्री कुंजाम, मुक्तिपथचे संतोष सावलकर, शिक्षण विभागाचे श्री मडावी तसेच सामाजिक कार्यकर्त्या मीना दिवटे आदी उपस्थित होते.















