
भामरागड प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज : ग्रामपंचायत नेलगुंडा येथील ग्रामसेवकांच्या निष्क्रीय व दुर्लक्षपूर्ण कामकाजाविरोधात संताप व्यक्त करत ग्रामस्थांनी त्यांना तात्काळ हटवून नवीन ग्रामसेवक नेमण्याची जोरदार मागणी केली आहे. याबाबत गटविकास अधिकारी, पंचायत समिती भामरागड यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर ग्रामसेवक मुख्यालयी राहत नसल्यामुळे ग्रामपंचायतीचे कामकाज विस्कळीत होत असून नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित राहत आहेत. याशिवाय, ग्रामसेवक नागरिकांचे फोन उचलत नाहीत, अनेकदा कामासाठी संपर्क साधल्यास फोन बंद करून ठेवतात, असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे तातडीची कामे देखील अडकून पडत असून नागरिकांना मोठ्या प्रमाणावर मनस्ताप सहन करावा लागत आहे.
तसेच, ग्रामपंचायत मधील विविध विकास कामांकडेही ग्रामसेवकांकडून दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक कामे रखडली आहेत. यामुळे गावाच्या एकूण विकासावर विपरीत परिणाम होत असून ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
नागरिकांकडून वारंवार तक्रारी करूनही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. शासकीय योजना, प्रमाणपत्रे व इतर कामांसाठी नागरिकांना मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या पार्श्वभूमीवर भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) तसेच ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थांच्या वतीने प्रशासनाला ७ दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. या कालावधीत संबंधित ग्रामसेवकावर कारवाई करून नवीन ग्रामसेवकाची नियुक्ती न झाल्यास पंचायत समिती कार्यालयासमोर अनिश्चितकालीन आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
यावेळी कॉ. सचिन मोतकुरवार (जिल्हा सहसचिव, भाकपा), कॉ. सुरज जककुलवार, कॉ. सुरेश मज्जी, तसेच उपसरपंच नेलगुंडा सरजू मज्जी, ग्रामपंचायत सदस्य विष्णू पुंगाटी, सुरेश ताडो, कोलू ताडो यांच्यासह ग्रामपंचायतमधील अनेक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमुखाने ग्रामसेवक बदलण्याची मागणी केली.
यावेळी बोलताना कॉ. सचिन मोतकुरवार म्हणाले, “ग्रामसेवक हा गावाच्या प्रशासनाचा कणा असतो, मात्र नेलगुंडा येथे ग्रामसेवकाच्या निष्काळजी व बेजबाबदार कामकाजामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. फोन न उचलणे, मुख्यालयी अनुपस्थित राहणे आणि विकास कामांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. प्रशासनाने तात्काळ कारवाई करून नवीन ग्रामसेवक नियुक्त करावा, अन्यथा भाकपा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल.”















