शिक्षण हे प्रगतीचे द्वार, प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करून यश संपादन करावे – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

0
17

प्रज्ञा निमगडे
जिल्हा प्रतिनिधी
गडचिरोली

गडचिरोली : आदिवासींचे निसर्गाशी वर्षानुवर्षांचे नाते आहे. निसर्गाशी जुळवून घेत त्यांनी जीवन जगण्याची कला साध्य करत आपली संस्कृती व परंपरा जपली आहे. गोंडवाना विद्यापीठातील विविध उपक्रमांतून आदिवासी मुले- मुली शिक्षणाच्या प्रवाहात येत आहेत. शिक्षण हेच प्रगतीचे द्वार असून प्रत्येकाने जिद्दीने प्रयत्न करुन प्रगती करावी, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले.
येथील गोंडवाना विद्यापीठात दहावा दीक्षांत समारंभ विद्यापीठ परिसरात ५ जुलै रोजी सकाळी पार पडला. यावेळी राज्यमाल रमेश बैस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ.विजयकुमार गावित, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांची उपस्थिती होती. सकाळी पावणे अकरा वाजता मान्यवरांचे मंचावर आगमन झाले. तत्पूर्वी विद्यापीठ परिसरातून कार्यक्रमस्थळापर्यंत शैक्षणिक शोभायात्रा काढण्यात आली होती
कुलगुरु डॉ.प्रशांत बोकारे यांनी मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते अमित रामरतन गोहणे, अर्पिता पुरुषोत्तम ठोंबरे, हलामी लोकेश श्रीराम, अन्सारी सदाफ नसीफ अहमद , संतोष प्रकाश शिंदे व सारिका बाबूराव मंथनकार या गुणवंतांचा सुवर्णपदक पटकावल्याबद्दल राष्ट्रपतींच्या हस्ते पदवीप्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. गोगाव (अडपल्ली) येथील १७७ एकरवरील नियोजित विद्यापीठ कॅम्पसच्या कोनशिलेचे व्हर्च्यूअल पध्दतीने अनावरण करण्यात आले.
राज्यपाल रमेश बैस यांनी सुवर्णपदकविजेत्या व दीक्षांत समारंभात गौरविलेल्या विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक रहा, असा उपदेश केला. कार्यक्रमाची सुरुवात व समारोप राष्ट्रगीताने झाला. यावेळी विद्यार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरासह कार्यक्रमस्थळी कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here