prabodhini news logo
Home चंद्रपूर चंद्रपुरात खळबळ: २०० वर्षांच्या जुन्या तेलुगू स्मशानभूमीवर भूमाफियांचा डल्ला; मनसेची आक्रमक तक्रार

चंद्रपुरात खळबळ: २०० वर्षांच्या जुन्या तेलुगू स्मशानभूमीवर भूमाफियांचा डल्ला; मनसेची आक्रमक तक्रार

0
122
नम्रता सरदार मुख्य संपादिका प्रबोधिनी न्युज – चंद्रपूर : शहरातील महाकाली कॉलरी परिसरात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. गेल्या २०० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या तेलुगू समाजाच्या पारंपरिक स्मशानभूमीच्या जागेवर आणि लागून असलेल्या शासकीय जमिनीवर भूमाफियांनी अवैध कब्जा करून तिची विक्री सुरू केली आहे. या गंभीर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार केली असून दोषींवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे.
नेमके प्रकरण काय?
तक्रारीनुसार, मौजा चांदा (रै.) येथील सर्वे नं. ४१४ ही ०.७६.०० हेक्टर जागा शासकीय ‘झुडपी जंगल’ म्हणून नोंदणीकृत आहे. याच जागेला लागून तेलुगू समाजाची ऐतिहासिक स्मशानभूमी आहे. मात्र, परिसरातील काही खाजगी भूखंडधारक (सर्वे नं. ४१३, ४१५/१, २, ३ आणि ४१६) ही आपलीच जागा असल्याचे भासवून, चक्क २०० रुपये प्रति स्क्वेअर फूट दराने नोटरी करून या सरकारी जमिनीची अवैध विक्री करत आहेत.
पूर्वजांच्या समाधींची विटंबना; समाजबांधवांत संताप
धक्कादायक बाब म्हणजे, संबंधित भूमाफियांनी स्मशानभूमीच्या जागेवर जेसीपी (JCB) मशीन चालवून तिथल्या जुन्या समाधी उखडून फेकल्या आहेत. आपल्या पूर्वजांच्या अस्थींची आणि स्मृतींची अशा प्रकारे विटंबना झाल्यामुळे तेलुगू समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून सर्वसामान्यांची आर्थिक फसवणूकही केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
मनसेची कडक कारवाईची मागणी
मनसे जिल्हा सचिव किशोर मडगुलवार यांनी प्रशासनाला दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भूमी अभिलेख कार्यालयामार्फत या जागेची तात्काळ ‘मौका चौकशी’ करण्यात यावी. तसेच, सरकारी जमिनीची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या संबंधित व्यक्तींवर (रामटेके व इतर) कठोर कायदेशीर कारवाई करून गुन्हे नोंदवण्यात यावेत.”
हे निवेदन सादर करताना मनसे जिल्हा उपाध्यक्ष (मनविसे) कुलदीप चंदनखेडे, प्रविन शेवते, क्रिष्णा गुप्ता, फिरोज शेख, राजु देवागंन, शंकर भडके, साहील खान, पठाण आणि राजु नागपुरे प्रामुख्याने उपस्थित होते. आता या प्रकरणावर जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग काय पावले उचलणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here