
शैलिका सागवरे
मुख्य संपादक
प्रबोधिनी न्युज, चंद्रपूर
चंद्रपूर:-सहा वेद व आठरा पुराण लिहिणारे महर्षी व्यास मुनींच्या स्मृतीप्रित्यर्थ गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येतो.आपल्या जीवनाला आकार देणारा प्रत्येक लहान थोर व्यक्ती हा गुरू असतो. श्री गुरुदेव सेवा मंडळाची प्रणाली सुध्दा गुरू शिष्य परंपरेची वाहक आहे. तीच परंपरा कायम ठेवत श्री गुरुदेव सेवा मंडळ, खैरगाव व श्री गुरुदेव सेवा मंडळ, उर्जानगर यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीगुरुदेव सेवा मंडळ कार्यालय, खैरगाव येथे सामुदायिक प्रार्थनेनंतर गुरुपौर्णिमा कार्यक्रम घेण्यात आला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष उपकार्यकारी अभियंता मा प्रशांत दुर्गे साहेब यांनी गुरुपौर्णिमा उत्सवाचे महत्व विषद करताना सांगितले की ग्रामगीतेत वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात.
गुरू हाडामासाचा नोहे
गुरू नव्हे जाती संप्रदाय
गुरू शुद्ध ज्ञानतत्वचि आहे
अनुभवीयांचे
तसेच सामुदायिक प्रार्थना ही सर्व धर्माचा अभ्यास करून बनविलेली असल्यामुळे सर्व धर्माचा सार यात सामावले आहे. त्यामुळे आपण जर ग्रामगीता आत्मसात केली तर इतर कोणत्याही धर्माचे ग्रंथ वाचण्याची गरज नाही तसेच सामुदायिक प्रार्थनेला यावे ज्यामुळे उत्तम संस्कारांचे बीजारोपण होते.
प्रमुख अतिथी तथा प्रवचनकार अनिल खामनकर चिंचाळा यांनी श्री गुरुदेव सेवा मंडळ तत्वप्रणाली ही संस्कारक्षम वयात आलेल्या मुलांना जगण्याचा अर्थ समजावून सांगते तसेच नेहमी प्रार्थनेला जाणाऱ्या मुलांच्या आरोग्यावर तसेच बौद्धिक क्षमतेवर सकारात्मक परिणाम घडविते असे मत व्यक्त केले.
मा. मारोती साव मी दारुड्या म्हणत उपस्थितांचे मन जिंकणारे जेष्ठ गुरुदेव उपासक तथा प्रमुख मार्गदर्शक सन्मानीय मारोती साव दादा मुख्य समन्वयक झेप व्यसनमुक्ती केंद्र,चंद्रपूर यांनी आपल्या भारदस्त आवाजात व विशेष शैलीत ग्रामगीता व गुरुदेव तत्वज्ञान सांगताना व्यसन जडले तर माणसाची काय अवस्था होते याचे अनेक दाखले देऊन व्यसनापासून दूर राहण्याचा मोलाचा सल्ला दिला प्रथम आपण दारू पितो परंतू कालांतराने दारू आपल्याला पिवून टाकते हे सांगताना पाणावलेल्या डोळ्यांनी स्वतःचे आत्मकथन केले. ग्रामगीतेमधील एका ओविने माझे आयुष्य बदलू शकते तर ग्रामगीता तत्वज्ञान किती अनमोल आहे याची जाणीव करून दिली.
श्रीगुरुदेव प्रचारक विश्वासराव पानघाटे चिंचाळा यांनी सुध्दा विचारपिठा वरून उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी विचारपिठावर जेष्ठ नागरिक आनंदराव पाटील ताजने खैरगाव तसेच सुधा अटकरे खैरगाव, अर्चना गोहने सचिव श्रीगुरुदेव सेवा महिला मंडळ, ऊर्जानगर हे उपस्थित होते.
बहुसंख्येने महिला,तरुण व तरुणी तथा मुलांच्या उपस्थितीत संपन्न झालेल्या या गुरूपौर्णिमेच्या कार्यक्रमासाठी अनिल गडलवार, प्रतिभा पत्रकार,सुधा अतकरे, अरुणा खानझोडे, निर्मला खानझोडे, शशिकला भंडारे, विठाबाई शेडामे,सुनीता डाखरे, माया नांदेकर, ताराबाई कसारे, छाया जाधव ,सुरेखा ताजने, कुमारी सानिया टेकाम गुरुदेव सेवक सेविकांचे मोलाचे सहकार्य लाभले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवाधिकारी शंकरराव दरेकर यांनी केले व आभार कुमारी दीक्षा वाघ यांनी मानले.शेवटी राष्ट्रवंदनेने कार्यक्रमाची सांगता झाली.














