
कपिल एस. मेश्राम
ता. प्रतिनिधि
सिंदेवाही
सिदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील सेवा सहकारी संस्थेला शासनाने शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र म्हणून नियुक्त केले आहे. संस्थेमार्फत परिसरातील उन्हाळी धान खरेदी करण्यात आले. धान खरेदी करून संबंधित संस्थेने शेतकऱ्यांना मिळणाऱ्या रकमेसंबंधात सर्व प्रकीया पूर्ण केलेली आहे. परंतु 1 ते 2 महिना लोटूनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना विक्री केलेल्या धानाचचे पैसे मिळालेले नाही. त्यामुळे त्यांना त्वरित रक्कम अदा करावी, अशी मागणी होत आहे.
शेतकरी उन्हाळी पीक घेतल्यानंतर पावसाळी धानाचे उत्पादन घेतो. उन्हाळी धानाच्या उत्पान्नावर पावसाळी पीक घेण्याचे नियोजन असते. आता पावसाळी हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना बी- बियाणे, खते, धान रोवणी, औषधी घेण्यासाठी पैशाची नितांत गरज आहे आणि या पैशावर शेतकरी अवलंबून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची ही गरज लक्षात घेता जिल्हा मार्केटिंग फेडरेशन, चंद्रपूरने त्वरित पैसे अदा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सेवा सहकारी संस्थेचे संचालक मंगेश बोरकर यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.














