तिरुमलेश कंबलवार
गडचिरोली
गडचिरोली-एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत कारवाफा बिटस्तरीय तीन दिवसीय क्रीडा स्पर्धा येथील सेमाना बायपास रोडवरील धनुर्विद्या मैदानावर सोमवार ६ नोव्हेंबर पासून सुरू झाल्या.
उद्घाटक म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी अनिल सोमनकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रफुल पोरेड्डीवार होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते क्रीडाज्योत प्रज्वलित करून उद्घाटन झाले.
प्रमुख अतिथी म्हणून सहाय्यक प्रकल्प अधिकारी डॉ. प्रभु सादमवार, सुधाकर गौरकर, गडचिरोली येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेच्या शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा उर्मिला सिडाम, भाऊराव नन्नावरे, चंद्रशेखर सिडाम, केशव चव्हाण, प्रकल्प क्रीडा समन्वयक सतीश पवार, प्रमिला दहागावकर, मुख्याध्यापिका वंदना महल्ले, मुख्याध्यापक विजय देवतळे, मंगेश ब्राह्मणकर, अनिल पवार, सुनील नेवार, कनिष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी मुकेश गेडाम, संतोष कन्नाके, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, दादाजी सोनकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना प्रफुल पोरेड्डीवार म्हणाले, आदिवासी विद्यार्थी कला व क्रीडा गुणांनी निपुण आहेत. संधी मिळाल्यास प्रकल्प, विभागीय, राज्य व राष्ट्रीय स्तरावर आपले नावलौकिक करावे. बौद्धिक विकासासोबतच शारीरिक आरोग्य विकास महत्त्वाचे असून स्नेहभाव व खेळ भावनेने खेळाडूंनी खेळावे. यावेळी अनिल सोमनकर यांनी कुठलीही अनुचित घटना न घडता खेळाडूंनी खेळातून शिस्तीने स्फूर्ती घेऊन आपले जीवन घडवावे, असे आवाहन केले. कार्यक्रम दरम्यान शासकीय इंग्रजी माध्यम आश्रम शाळेतील मुला मुलीने पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले.
१७ वर्षाखालील वयोगटात मुलांचा कबड्डीचा उद्घाटनीय सामना कारवाफा व पोटेगाव संघा दरम्यान झाला. यात पोटेगाव संघ विजयी ठरला. संमेलनात गडचिरोली, कारवाफा, पोटेगाव, पेंढरी, गोडलवाही या शासकीय तर चांदाळा, गिरोला, गट्टा या अनुदानित अशा एकूण आठ शाळेतील २९४ मुले व २३४ मुली अशा एकूण ५२८ खेळाडूंनी भाग घेतला आहे. १४, १७ व १९ वर्ष वयोगटात कबड्डी, खो-खो, व्हॉलीबॉल, हँडबॉल, रिले या सांघिक व लांबउडी, उंचउडी, गोळाफेक थाळीफेक, भालाफेक धावणे या वैयक्तिक खेळाचे आयोजन केलेले आहे. स्पर्धांमधून आदिवासी विद्यार्थ्यांच्या अंगी असलेले सुप्त क्रीडागुण प्रदर्शित होणार आहे.
उद्घाटनानंतर रविकांत पिपरे यांनी पंच व खेळाडूंना शपथ दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका वंदना महल्ले यांनी केले. संचालन गुलाब डोंगरवार तर संदीप राठोड यांनी उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुभाष लांडे, रामदास पिलारे, यशपाल पेंदाम, डाकराम धोंगडे, प्रतिभा बनाईत, संगीता मोडक, शारदा कोटांगले, प्रियंका दुबे, गणेश दुर्कीवार, अमीर उईके, ज्योती टेकाम, साई सिडाम आदींसह कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहकार्य केले.

