सुभाष दरेकर
जिल्हा प्रतिनिधी
अहमदनगर
श्रीगोंदा-दिनांक 6 डिसेंबर 2023 गेल्या पाच दिवसांपासून शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के हे गाईच्या दुधाला प्रति लिटर 50 रु व म्हशीच्या दुधाला प्रति लिटर 80 रु दर मिळावा. कपाशीला प्रति क्विंटल 13,000/- तर तुरीला प्रति क्विंटल 12,000/- रु भाव मिळावा. श्रीगोंदा तालुक्यातील मागील वर्षी गाळप केलेल्या ऊसाला प्रतिटन 3 हजार रूपयांचा हमीभाव पूर्ण करण्यासाठी उर्वरित रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. श्रीगोंदा तालुक्यातील यावर्षी चालू हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला प्रतिटन 3,500/- रु भाव जाहीर करून पहिला हप्ता 3 हजार देण्यात यावा. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत देण्यात यावी. या सर्व प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी उपोषणास बसले होते.
शेतकरी नेते राजेंद्र म्हस्के हे विविध आंदोलनांनी नेहमी चर्चेत असतात. सलग पाच दिवसांचे उपोषण करून, त्यांनी वरील प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रशासनास चांगलेच वेठीस धरले. तहसीलदारांच्या लेखी आश्वासनानंतर म्हस्केंनी आमरण उपोषण स्थगित केले.
तहसीलदार ढोकले साहेब म्हणाले की, वरील सर्व मागण्यांपैकी एक मागणी आम्ही मान्य केली असून, अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकांची पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत. दूध बाजारभाव व कापूस, तूर हमीभाव हा प्रश्न वरिष्ठ पातळीवरील असून, वरिष्ठांकडे पत्रव्यवहार केला आहे. कारखान्याच्या निगडित प्रश्नांसंदर्भात संबंधित कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे.
भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग यांच्या हस्ते पाच दिवसांचे उपोषण स्थगित केले. यावेळी अनिल ठवाळ, संतोष लगड, भूषण बडवे, संदिप नागवडे, अरविंद कापसे, संतोष इथापे, शहाजी हिरवे, राजेंद्र मोटे, देवराव वाकडे, राजेंद्र भोस, अरूण जगताप, संतोष शिंदे, रघुनाथ सुर्यवंशी, महादेव म्हस्के आदी मान्यवर उपस्थित होते.
दरम्यान पाच दिवसांच्या कालावधीत तालुक्यातील जेष्ठ नेते बाबासाहेब भोस, बीआरएसचे नेते घनश्याम शेलार यांच्यासह विविध संघटनांनी व पदाधिकार्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.
जनआंदोलन उभा करून शेतकरी लढाई जिंकणारच – राजेंद्र म्हस्के (शेतकरी नेते) म्हस्के म्हणाले की, शेतकरी प्रश्नांसाठी आजपर्यंत संघर्ष केला आहे.आज पाच दिवसांचे उपोषण जरी स्थगित केले असले,तरी देखील जोपर्यंत प्रश्न मार्गी लागणार नाहीत. तोपर्यंत जनजागृती करून मोठे जनआंदोलन करणार आहे.
16 डीसेंबर रोजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक – दिलीप भालसिंग(जिल्हा अध्यक्ष भाजपा) भालसिंग म्हणाले की, राजेंद्र म्हस्के हे पक्षाचे जुने नेते आहेत. सर्व प्रश्न शेतकऱ्यांच्या जिव्हाळाचे असून, या प्रश्नांसंदर्भात म्हस्के यांना घेऊन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहोत. सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहोत

