नागरिकांना मोठा दिलासा, आ. किशोर जोरगेवार यांनी खेचून आणला पाच कोटींवर निधी..
प्रियंका मेश्राम महिला विशेष जिल्हा प्रतिनिधी – चंद्रपूर : चंद्रपूर आणि बाबूपेठ शहराला जोडणारा अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा बाबूपेठ उड्डाण पुलाचे बांधकाम निधीअभावी रखडले होते, ज्यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला आणि अखेर ५ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. त्यामुळे आता या कामाला गती मिळणार आहे.
बाबूपेठ रेल्वे उड्डाण पूल ही चंद्रपूरातील मोठ्या समस्यांपैकी एक आहे. येथे उड्डाण पूलाचे बांधकाम व्हावे, यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांचे सातत्याने प्रयत्न सुरू होते. ते निवडून आल्यानंतर या कामाला गती मिळाली होती. मात्र, अतिक्रमणधारक आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे कामाला विलंब झाला होता. दरम्यान, बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम अंतिम टप्प्यात पोहोचले असतानाच निधीअभावी काम पुन्हा एकदा रखडले.
आ. किशोर जोरगेवार यांनी १० जुलै २०२४ रोजी मनपा अधिकाऱ्यांशी बैठक घेत उड्डाण पुलाच्या बांधकामाच्या स्थितीबाबत आढावा घेतला. यावेळी पूलाचे बांधकाम पूर्ण करण्यासाठी जवळपास ५ कोटी रुपयांच्या अतिरिक्त निधीची गरज असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले होते. यावेळी आ. किशोर जोरगेवार यांनी हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले आणि तातडीने पाठपुरावा सुरू केला.
अखेर नगर विकास विभागाच्या वतीने बाबूपेठ उड्डाण पुलाच्या बांधकामासाठी ५ कोटी ४९ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली आहे, आणि त्याचा जीआरही शासनाच्या वतीने प्रकाशित करण्यात आला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यात असूनही केवळ निधीअभावी रखडलेले बाबूपेठ उड्डाण पुलाचे काम आता पूर्ण होणार आहे.
आ. किशोर जोरगेवार यांनी याबाबत वेळोवेळी शासन स्तरावर बैठका घेत कामाला गती देण्याचे प्रयत्न केले होते. बाबूपेठ रेल्वे रुळ हा येथील नागरिकांसाठी मोठी समस्या होती. येथे उड्डाण पूल तयार करण्याची येथील नागरिकांची ५० वर्ष जुनी मागणी होती. निवडून आल्यावर त्यांनी या प्रस्तावित कामाला गती दिली. मात्र, रेल्वे विभागाअंतर्गत पुलाच्या तिसऱ्या भागाच्या कामामुळे विलंब झाला होता. आता हे काम पूर्ण झाले असून केवळ पालिकेअंतर्गत करण्यात येणारी कामे अपूर्ण आहेत.यासाठी लागणारा ५ कोटी रुपयांचा निधी मिळवून देता आला याचा आंनद आहे असल्याचे म्हणत “दिक्षाभूमी नंतर बाबूपेठ रेल्वे उड्डाण पुलासाठीही अतिरिक्त निधी उपलब्ध करून दिल्यामुळे मला समाधान वाटत असल्याचे आमदार किशोर जोरगेवार यांनी म्हटले आहे.

