काँग्रेस पक्षानेच देशाच्या मूळनिवासी, आदिवासी समाजाच्या वेदना जानल्या – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

0
810

आम्ही विदर्भाचे खंबीर नेतृत्व वडेट्टीवार यांचे सोबत – अवाचितराव सयाम

तर वर्गिकरणातून समाजात फुट पाडण्याचा विरोधकांचा डाव – खासदार डॉ. किरसान

कपिल मेश्राम
विशेष जिल्हा प्रतिनिधि
चंद्रपुर

आपल्या मायभुमिसाठी आदिवासी समाजातील विर योद्धांनी आपल्या प्राणाची बाजी लावून इंग्रज राजवटीला हादरून सोडले. देशाचा मूळ मालक आदिवासीं समाज असतांना त्या समाजाचे आरक्षण संपुष्टात आणण्यासाठी आता विरोधक वर्गिकरणाचा फंडा वापरत असुन याचा प्रतिकार सर्व प्रथम मी केला. या मूळ मालकांना आज विभागून पुन्हा अन्याय करण्याच्या दृष्टीने मनुस्मृती विचारधारा सत्तेचा उन्माद आहे . अश्या मनुवादी विचारांच्या सरकारचा नायनाट करा . व सदैव आदिवासीं समाजाच्या पाठीशी उभे राहून त्यांच्या वेदना जाणणाऱ्या काँग्रेसला साथ द्या.असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केले ते सिंदेवाही येथे जनसेवा गोंडवाना पार्टी तथा समस्त गोंडियन सामाजिक संघटना यांच्या वतीने आयोजित भव्य समाज मेळाव्या प्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते.

आयोजित कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचितराव सयाम, सत्कारमूर्ती म्हणून चिमूर – गडचिरोली नवनिर्वाचित खासदार डॉ. नामदेव किरसान, तर प्रमुख अतिथी म्हणून जनसेवा गोंडवाना पार्टी प्रदेशाध्यक्ष प्रा. धीरज शेडमाके, जनसेवा गोंडवाना पार्टी चंद्रपूर – गडचिरोली लोकसभा अध्यक्ष बंडुजी मडावी, जनसेवा गोंडवाना पार्टी ब्रम्हपुरी विधानसभा अध्यक्ष प्रल्हाद उईके, काँग्रेस जिल्हा सचिव प्रमोद बोरीकर, सिंदेवाही काँग्रेस तालुका अध्यक्ष रमाकांत लोधे, शहराध्यक्ष सुनिल उट्टलवार माजी नगराध्यक्ष स्वप्निल कावळे,जनार्दन गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य नयना गेडाम, रूपा सुरपाम, खोजराज मरस्कोल्हे, ज.गो.पार्टी ता.अ. सुनील पेंदाम, नगरसेवक अमृत मडावी, सावली ता. अ. नेताजी मेश्राम व अन्य मान्यवर मंचावर उपस्थित होते.

यापुढे बोलताना विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, माझे कार्यक्षेत्र गडचिरोली जिल्हा असल्याने आदिवासी समाजाची माझी नाळ पूर्वीपासूनच जुळलेली आहे. सन 1982 च्या काळात मी आदिवासी तरुणांसाठी नोकरीची संधी उपलब्ध व्हावी याकरिता स्वतः वर्तमानपत्रे पोहोचवण्याची काम करीत होतो. तर पोलिसांच्या गोळीबारात मृत पावलेल्या चिन्हा मट्टामी या तरुणाला विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित करून मी न्याय मिळवून दिला. अतिशय प्रामाणिक व आपल्या मायभूमीसाठी समर्पित या समाजासाठी काँग्रेस सरकार काळात विविध जनकल्याणकारी योजना व निर्णय घेण्यात आले. आदिवासी समाज बांधव हे जमिनीची मूळ मालक असल्याने त्यांना पट्टे वाटप सुद्धा काँग्रेस सरकार काळात करण्यात आले. सिंदेवाही तालुक्यातील गडबोरी लगत ओलासुर या तीर्थस्थळी 3 कोटी विकास निधी देऊन विकास करणार असेही ते यावेळी म्हणाले. यानंतर जनसेवा गोंडवाना पार्टीच्या वतीने विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार तथा चिमूर – गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव कीरसान यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
तर सत्कारमूर्ती डॉक्टर नामदेव कीरसान यांनी आपल्या मार्गदर्शनातून आदिवासी समाजातील 45 जातीमधील वर्गीकरण व याचे समाजावर होणारे दुष्परिणाम याचे महत्त्व पटवून देत सरकारवर निशाणा साधला. सोबतच डिलीस्टिंग बाबत बैठक घेऊन आरएसएसने चालविलेले षडयंत्र याची पोलखोलही केली. तर अध्यक्षीय भाषणात जनसेवा गोंडवाना पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अवचितराव सयाम यांनी भाजपच्या द्वेशी राजकारणातून विदर्भाची बुलंद तोफ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचे पाय ओढण्याचे काम आगामी निवडणुकांमध्ये होणार असून त्यांना धडा शिकवा व सर्व समावेशक नेतृत्व विजय वडेट्टीवार यांच्या पाठीशी खंबीर उभे राहा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. तत्पूर्वी आदिवासी समाजाचे पारंपरिक वाद्य व आदिवासी संस्कृती दर्शवणारे नृत्य सादर करीत शहरातून रॅली काढण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड.किशोरी शेडमाके, प्रास्ताविक प्राध्यापक धीरज शेडमाके, तर आभार सुनिल पेंदाम यांनी मानले.
कार्यक्रमाप्रसंगी हजारोंच्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here