सुविद्या बांबोडे जिल्हा संपादक – भद्रावती, दिनांक १२/०९/२०२४: भद्रावती तालुक्यातील शेतकऱ्यांना शेती विम्याचे पैसे मिळाले नसल्याने त्यांच्या आर्थिक परिस्थितीत मोठी अडचण निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीच्या वतीने आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक यांच्या मार्गदर्शनात व तालुका प्रमुख सुरज खंगार यांच्या नेतृत्वात आज तहसीलदार साहेब,भद्रावती यांना शेतकऱ्यांना शेती विम्याचे पैसे मिळण्याबाबत निवेदन देण्यात आले.
निवेदनाद्वारे शेतकऱ्यांना विम्याचे पैसे त्वरित मिळवून देण्यासाठी संबंधित विभागांना सूचित करण्याची विनंती करण्यात आली. शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाल्यानंतर विमा कंपन्यांनी अद्यापही पैसे न दिल्यामुळे त्यांचे आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. शेती हा त्यांच्या उपजीविकेचा एकमेव मार्ग असल्यामुळे या विलंबामुळे त्यांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
यावेळी, आम आदमी पार्टीच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देऊन त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी पुढील संघर्षाची तयारीही दर्शवली. तहसीलदार साहेबांनी निवेदनाची दखल घेतली असून, याबाबत लवकरच कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.
आम आदमी पार्टी तालुका भद्रावतीच्या वतीने हा प्रश्न शेतकऱ्यांच्या हितासाठी गंभीरतेने घेतला जाईल आणि त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी संघर्ष केला जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे. यावेळी आम आदमी पार्टी जिल्हा उपाध्यक्ष तथा वरोरा – भद्रावती विधानसभा प्रमुख सुरज शहा, युवा जिल्हा उपाध्यक्ष सुमित हस्तक, तालुका अध्यक्ष सूरज खंगार,अमित कासारे सतीश कुथे, प्रमोद टोंगे, अभय दुधे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थितीत उपस्थित होते.

