
कपिल मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधि, चंद्रपुर – सिंदेवाही-लोनवाही नगरपंचायतयेथील नगरध्यक्ष आणि उपाध्यक्ष या दोन्ही पदांकरिता शुक्रवार (दि. १३) रोजी निवडणूक घेण्यात आली होती. यात काँग्रेस पक्षाचे भास्कर नन्नावार हे नगराध्यक्ष तर सौ. पूजा रामटेके उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवडून आले.
मागील अडीस वर्षाआधी झालेल्या नगरपंचायतीच्या निवडणूकीमध्ये काँग्रेस पक्षाचे १३, भाजपाचे ३ आणि अपक्ष १ नगरसेवक विजय झाले. यात १३ नगरसेवक काँग्रेस पक्षाचे असल्याने काँग्रेस पक्षाने एक हाती सत्ता मिळविली होती. विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टिवार यांचे खंदे समर्थक म्हणून मानले जाणारे स्वप्नील कावळे हे नगरध्यक्ष पदी तर मयूर सूचक हे उपाध्यक्ष पदावर विराजमान झाले होते. मात्र अडीस वर्षाचा कार्यकाळ पूर्ण झाल्याने आणि नवीन चहेऱ्यांना संधी मिळावी या उद्देशाने त्यांनी स्वत:हुन आपल्या पदाचा राजीनामा दिला होता त्यामुळे येथील दोन्ही पदे ही रिक्त होती. शुक्रवार (दि. १३) रोजी दुपारी १२ वाजता अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाकरिता निवडणूक घेण्यात आली होती. यात अध्यक्ष म्हणून भास्कर नन्नावार तर उपाध्यक्ष म्हणून सौ. पूजा रामटेके यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
ही निवडणूक प्रक्रिया पीठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी राहुल कंकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. निवडणूक प्रक्रिये दरम्यान सर्व नगरसेवक, नप चे कर्मचारी उपस्थित होते.














