
दिपाली पाटील जिल्हा उपसंपादक, चंद्रपूर – आज दिनांक: २१ सप्टेंबर २०२४ इनरव्हील क्लब ऑफ चंद्रपूर तर्फे सिटी कन्या विद्यालयात सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श या विषयावर मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले. या सत्राद्वारे विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याविषयी माहिती दिली गेली आणि त्याचे महत्त्व समजावून सांगितले.
वैशाली बर्डे यांनी विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याचा अर्थ समजावून सांगत त्याविषयीची सखोल माहिती दिली. त्यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक असलेल्या खबरदारी आणि सतर्कतेबद्दल जागरूक केले.वैशाली बर्डे यांनी महाराष्ट्रात दिवसेंदिवस वाढत असलेल्या महिला अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर मुलींना स्वतःला सुरक्षित ठेवण्याबाबत माहिती दिली. त्यांनी कोणाकडून मदत घ्यावी आणि महिलांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांविषयी देखील मार्गदर्शन केले. प्रकल्प संचालिका प्रतिमा नायडू यांनीही मुलांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे महत्त्व स्पष्ट करत आपले विचार मांडले.
क्लबच्या अध्यक्ष सुचिता जेऊरकर यांनी सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श समजून घेण्याचे महत्त्व आणि यासंदर्भातील सतर्कतेची आवश्यकता सांगून विद्यार्थ्यांना योग्य मार्गदर्शन केले. सचिव पल्लवी तेलंग आणि इतर क्लब सदस्यांनी देखील या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी मोलाचे योगदान दिले.
सुरक्षित आणि असुरक्षित स्पर्श याविषयी जागरूकता निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, विशेषतः शाळेतील विद्यार्थ्यांसाठी या प्रकल्पा मुळे मुलांना त्यांच्या शरीराची योग्य जाणीव झाली आणि त्यांना स्वतःच्या सुरक्षिततेची काळजी घेण्यास प्रोत्साहित केले. अशा प्रकारचे मार्गदर्शन सत्र मुलांच्या भावी सुरक्षिततेसाठी आणि त्यांना आत्मविश्वासाने वावरण्यासाठी आवश्यक आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांमध्ये सतर्कता वाढली असून, त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारच्या अयोग्य स्पर्शाचा सामना करण्याची मानसिक तयारी झाली.














