
प्रियंका मेश्राम विशेष जिल्हा प्रतिनिधी प्रबोधिनी न्युज पुणे – दिनांक २६ नोव्हेंबर २०२४ रोजी संविधान दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य पुण्यात क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. या ऐतिहासिक दिनानिमित्त स्थानिक लोकप्रतिनिधी, नवनिर्वाचित आमदार महेश सावंत (माहिम विधानसभा मतदारसंघ), उपसंचालक नवनाथ फरताडे, व जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास व्हनमाने जिल्हाधिकारी कार्यालयाचे बकरे, क्रीडा अधिकारी दत्ता माने यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पदयात्रा समर्थ व्यायाम मंदिर, शिवाजी पार्कवरून सुरू होत, महापौर बंगला मार्गे चैत्यभूमी पर्यंत गेली. या उपक्रमात १२६० हून अधिक विद्यार्थी, एनसीसी, स्काऊट गाइड, खेळाडू आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते, ज्यांनी समाजातील विविध क्षेत्रांतील लोकांचे प्रतिनिधित्व केले.

कार्यक्रमाच्या प्रारंभात मान्यवरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून मानवंदना दिली. कार्यक्रमानंतर संविधानाची प्रतिज्ञा वाचन करून विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला गेला. या पदयात्रेने संविधानाच्या महत्वाची जाणीव निर्माण करण्यास आणि समाजातील विविध घटकांचे एकत्र येण्यास एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून दिले.
अशा उपक्रमामुळे सर्व समाजातील जनतेमध्ये संविधानाबद्दल जागरूकता निर्माण होत आहे, ज्याने सशक्त समाजाची निर्मिती होण्यास मदत होईल.














