मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत केली मागणी..
चंद्रपूर जिल्ह्यातील सहकारी संस्थांनी शासनाच्या अटल अर्थसहाय्य योजने अंतर्गत प्रकल्प उभारणीसाठी सादर केलेल्या मंजूर प्रस्तावांना चालू आर्थिक वर्षात तातडीने निधी वितरित करण्यात यावा, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई मंत्रालयात भेट घेऊन केली. यावेळी त्यांनी संबंधित मागणीचे निवेदनही मुख्यमंत्री फडणवीस यांना सादर केले.या भेटीप्रसंगी भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण तालुकाध्यक्ष नामदेव डाहुले, मनोज पाल आदीची उपस्थिती होती.
चंद्रपूर जिल्ह्यातील एकूण १५ सहकारी संस्थांनी प्रत्येकी ५ लाख रुपये गुंतवणूक करून अटल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत शेती उपयोगी प्रकल्पांसाठी सहकार विभागाकडे प्रस्ताव सादर केले आहेत. सर्व संस्थांनी आवश्यक कागदपत्रांसह त्रुटींची पूर्तता पूर्ण केली असूनही अद्याप निधी मिळालेला नाही.
विशेष म्हणजे, स्कॉर्पिओ, ट्रक यांसारख्या वाहनांसाठी निधी वितरित करण्यात आला आहे. मात्र अर्थमूव्हर्स सारख्या शेतीसाठी उपयुक्त वाहनांना या योजनेच्या लाभातून वगळण्यात आले आहे. अर्थमूव्हर्स वाहनांचा शेतीतील पाट काढणे, तळी साफ करणे, समांतर करणे, गाळ काढणे यांसारख्या अवजड कामांमध्ये उपयोग होतो. तरीही संबंधित अधिकाऱ्यांकडून या प्रस्तावांना अंतिम मंजुरी दिली गेलेली नाही.
या अन्यायामुळे सहकारी संस्थांवर ताण आला असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित हस्तक्षेप करून मंजूर प्रस्तावांवरील निधी वितरित करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना द्याव्यात, अशी मागणी आमदार किशोर जोरगेवार यांनी यावेळी केली. यावेळी मतदार संघातील विविध विकासकामांवर सुद्धा चर्चा करण्यात आली असून प्रलंबित असलेले विकास कार्यांना मंजुरी देण्याची मागणी यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.

