कृषी विभागाच्या वतीने खरीप हंगाम २०२५-२६ तालुकास्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन
स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – शेती हा आपल्या जिल्ह्याचा आत्मा आहे. आपला शेतकरी दिवसरात्र राबतो, उन्हातान्हात शेतात घाम गाळतो. पण कधी पावसाचा लहरीपणा, तर कधी बाजारभावातील चढ-उतार यामुळे त्याला नफा मिळतोच असे नाही. म्हणूनच या खरीप हंगामासाठी नियोजन करताना शेतकऱ्यांच्या सोयी, गरजा आणि अडचणी केंद्रस्थानी ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. असे प्रतिपादन आमदार किशोर जोरगेवार यांनी केले.
कृषी विभागाच्या वतीने प्रकल्प संचालक आत्मा कार्यालयाच्या सभागृहात खरीप हंगाम २०२५-२६ संदर्भातील तालुकास्तरीय नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कृषी क्षेत्रात नाविन्यपूर्ण काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात आमदार किशोर जोरगेवार बोलत होते.
यावेळी जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी शंकर तोरावार, चंद्रपूर कृषी अधिकारी गजानंद पवार, तालुका कृषी अधिकारी अनिकेत अमाणे, नामदेव डाहुळे, कापूस संशोधक श्रीकांत अमरशेट्टीवार आदी मान्यवरांची मंचावर उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलताना आ. जोरगेवार म्हणाले, आजच्या या बैठकीत खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कोणती बियाणं उपलब्ध आहेत, खतांचा पुरवठा योग्य वेळी होईल का, शेतकऱ्यांना शासकीय योजनांचा लाभ सुलभतेने मिळेल का, यासारख्या सर्व गोष्टींचा आपण आढावा घेतला आहे. शासन अनेक योजना राबवत आहे. त्या योजनांचा लाभ शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी अधिकाऱ्यांनी जबाबदारीने काम करावे.
तुमच्या कष्टाला योग्य दाद मिळावी, तुमच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य यावं, हेच माझं स्वप्न आहे. आपल्या मातीत, आपल्या हातात आणि आपल्या घामात या देशाचं भविष्य दडलेलं आहे. बियाण्यांचं वेळेवर वितरण, खते, कीडनाशके यांचं योग्य नियोजन, पाणीपुरवठ्याचा प्रश्न, नैसर्गिक आपत्तींवरची तयारी या सगळ्या बाबींवर अधिकाऱ्यांनी तातडीने व परिणामकारक कृती केली पाहिजे.शेतकरी तक्रार घेऊन आला तर ती फाईलवर नको, तर कृतीवर दिसली पाहिजे, असेही आमदार किशोर जोरगेवार यांनी ठामपणे सांगितले. या कार्यक्रमाला शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

