पाणीटंचाई, गाळ उपसा, स्वच्छता यावर आमदार किशोर जोरगेवार यांचे ठोस आदेश.

0
6

मनपा सभागृहात बैठक, विविध विकासकामांचा घेतला आढावा

स्वाती मेश्राम जिल्हा उपसंपादक चंद्रपूर – शहराच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांच्या अध्यक्षतेखाली महापालिकेत एक बैठक पार पडली. इरई नदीतील गाळ उपसा तसेच शहरातील विविध मूलभूत सुविधा आणि पायाभूत कामांचा आढावा घेण्यासाठी आयोजित या बैठकीत पाणीपुरवठा, कचरा व्यवस्थापन, आदी विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी महत्त्वपूर्ण सूचना मनपा प्रशासनाला दिल्या.
या बैठकीस मनपा आयुक्त विपिन पालिवाल, महसूल विभागाचे उपविभागीय अधिकारी संजय पवार, तहसीलदार विजय पवार, अतिरिक्त आयुक्त चंदन पाटील, उपायुक्त मंगेश खवले, स्वच्छता विभागाचे निरीक्षक डॉ. अमोल शेडकी, बांधकाम विभागाच्या अभियंता वैष्णवी रिठे, भारतीय जनता पार्टीचे माजी शहराध्यक्ष दशरथसिंग ठाकूर, तुषार सोम, माजी नगरसेवक सुभाष कासनगोट्टूवार, माजी नगरसेविका छबू वैरागडे, कल्पना बबूलकर, माजी नगरसेवक प्रदीप किरमे, श्याम कनकम, राजेंद्र अडपेवार, अरुण तिखे, वंदना हातगावकर, सुरेश तालेवार, मंजुश्री कासनगोट्टूवार, प्रज्ञा बोरगमवार, करणसिंग बैस, करण नायर, विनोद अनंतवार आदी उपस्थित होते.
शहर व परिसरातील पाणी टंचाईच्या पार्श्वभूमीवर इरई नदीतील गाळ उपसा हे एक महत्त्वाचे काम ठरत असून, या कामाच्या प्रगतीचा व अडचणींचा सविस्तर आढावा आमदार किशोर जोरगेवार यांनी या बैठकीत घेतला. बैठकीदरम्यान त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून गाळ उपसण्याची सद्यस्थिती, यंत्रसामुग्रीची उपलब्धता आणि कामाचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती घेतली. कामात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी आवश्यक ती मदत दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शहरातील काही भागांमध्ये निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर आमदार जोरगेवार यांनी टँकरद्वारे सातत्यपूर्ण पाणीपुरवठा सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. झोननिहाय पाणीवाटप अधिक कार्यक्षम पद्धतीने होण्यासाठी ठोस उपाययोजना राबविण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच पाण्याच्या टाक्या आणि टँकरच्या स्थान निश्चितीचे काम तातडीने पूर्ण करावे, असे स्पष्ट निर्देश प्रशासनाला यावेळी देण्यात आले.
परिसरातील रस्ते व बांधकामाच्या कामांची सविस्तर समीक्षा करताना, या प्रकल्पांना गती देण्याची गरज आमदार किशोर जोरगेवार म्हणाले केली. शहराच्या स्वच्छता व्यवस्थेतील त्रुटी दूर करताना डिव्हायडर देखभाल, फुलझाडे लावणे यांसारख्या सौंदर्यीकरण च्या उपक्रमांना अधिक गती देण्यावरही भर देण्यात आला. प्रशासनाने नागरिकांच्या समस्या तातडीने आणि प्रभावीपणे सोडवाव्यात, अशा सूचना यावेळी आमदार जोरगेवार यांनी केल्यात. या बैठकीला संबधित अधिकारी आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here