चंद्रपूर जिल्हाधिकारी ठरले राज्यात सर्वोत्कृष्ट

0
49

Ø 84.29 गुणांसह प्रथम क्रमांक

Ø 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहीम

चंद्रपूर, दि. 2 मे : राज्य शासनाच्या 100 दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा मोहिमेत चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. हे राज्यातून सर्वोत्कृष्ट ठरले आहे. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या नेतृत्वात 84.29 गुण मिळवत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून राज्यातील शासकीय कार्यालयांना शिस्त लावणे, नागरिकांची कामे जलदगतीने पूर्ण होणे आणि शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होणे या उद्देशाने 100 दिवसांची कार्यालयीन सुधारणा मोहिम हाती घेण्यात आली होती. या मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचे मूल्यमापन महाराष्ट्र दिनी जाहीर करण्यात आले. यात उत्कृष्ट जिल्हाधिकारी कार्यालय श्रेणीत चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाने बाजी मारली. तर द्वितीय क्रमांक जिल्हधिकारी कार्यालय, कोल्हापूर (गुण 81.14), तृतीय जिल्हाधिकारी जळगाव (80.86), चतुर्थ जिल्हाधिकारी अकोला (78.86) आणि पाचवा क्रमांक जिल्हाधिकारी नांदेड (66.86 गुण) यांनी पटकाविला.
याबाबत बोलतांना जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयाला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला, ही आपल्या सर्वांसाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी – कर्मचा-यांचे यात मोठे योगदान आहे. लोकांना अधिकाधिक चांगल्या सेवा कशा देता येईल, शासन त्यांच्यापर्यंत कसे पोहचले, याबाबत योग्य नियोजन करण्यात आले. तसेच शासनाच्या सुचनेप्रमाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील संकेतस्थळाचे अद्ययावतीकरण, तक्रार निवारण, अभ्यागतांसाठी सोयीसुविधा, ई-ऑफिस प्रणालीचा वापर, कृत्रीम बुध्दीमत्तेचा वापर करून अधिकार व कर्मचा-यांना प्रशिक्षण, गुंतवणूकीस प्रोत्साह आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा यात समावेश होता, असे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व विजेत्या अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. ते म्हणाले, गुणवत्ता मोहिम एक सुरवात आहे. भविष्यातील महाराष्ट्राच्या प्रशासनासाठी ही एक आदर्श कार्यपद्धती ठरेल. नागरिकांना जीवन सुखकर करण्यासाठी ही मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेचे चळवळीत रुपांतर होऊन नागरिकांना उत्तम सेवा देण्यासाठी सर्व अधिकाऱ्यांनी काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले.
मुल्यांकन पध्दत : भारतीय गुणवत्ता परिषद (Quality Council of India) मार्फत संकेतस्थळ अद्यावतीकरण व कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here