दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक.
सुविद्या बांबोडे विदर्भ संपादिका प्रबोधिनी न्युज – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र चरणस्पर्शाने पावन झालेल्या दिक्षाभूमीचा जागतिक पातळीवर विकास करण्याचा संकल्प आमदार किशोर जोरगेवार यांनी केला आहे. त्यांच्या प्रयत्नातून या पवित्र स्थळाच्या विकासासाठी ५६ कोटी ९० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातील जवळपास १४ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे या कामांना गती देण्याचे निर्देश आमदार किशोर जोरगेवार यांनी दिले.
दिक्षाभूमीच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठी आमदार किशोर जोरगेवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील २० कलमी सभागृहात बैठक बोलावली होती. सदर बैठकीला जिल्हाधिकारी विनय गौडा, समाजकल्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त विनोद माहुतुरे, समाज कल्यान विभागाच्या स्मिता बैहीरमवार, सार्वजनिक विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, दिक्षाभुमी ट्रस्टचे उपाध्यक्ष अशोक घोटेकर, कुणाल घोटेकर, राहुल घोटेकर, प्राचार्य दहेगावकर, निवृत्त प्रा संजय बेले, भारतीय जनता पक्षाचे माजी शहर अध्यक्ष दशरथसिंह ठाकुर, भाजप नेते प्रकाश देवतळे, माजी नगर सेवक बलराम डोडाणी, मनोज पाल, रवी गुरुनुले, रंजन ठाकूर, करणसिंह बैस, कार्तिक बोरेवार आदींची उपस्थिती होती. यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी दिक्षाभूमीच्या विकासकामाबाबतची सद्यस्थिती जाणून घेतली आणि सर्व प्रक्रिया जलद पूर्ण करून कामाला सुरुवात करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.
पवित्र स्थळाचा विकास नेटका व भव्य व्हावा, यासाठी सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा. निधीचा योग्य वापर होईल याची काळजी घ्या, असे ते यावेळी म्हणाले. दिक्षाभूमीच्या विकासासाठी मागील अनेक वर्षांपासून आपण प्रयत्नशील होतो. आता निधी मंजूर झाल्यामुळे जागतिक पातळीवर या पवित्र स्थळाचा विकास होईल. दिक्षाभूमी हे जागतिक स्तरावर एक महत्त्वाचे पवित्र स्थान आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मृती जपण्यासाठी, त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी या ठिकाणाचा विकास अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळेच मागील अनेक वर्षांपासून आपण या विकासकामांसाठी सातत्याने पाठपुरावा करत होतो. या निधीतून सभागृह, पथदिवे, उद्यान, पाणीपुरवठा, शौचालय सुविधा, सुरक्षा यंत्रणा, स्थापत्यशास्त्रीय सौंदर्यवृद्धी आणि पर्यटकांसाठी आवश्यक सोयीसुविधा निर्माण केल्या जाणार आहेत. यामुळे दिक्षाभूमीचा विकास भव्य स्वरूपात होणार आहे. सर्व विभागांनी आपसात समन्वय साधावा.निधीचा प्रत्येक रुपया योग्य कामासाठीच वापरला गेला पाहिजे. कोणत्याही अडथळ्यामुळे विकासकामांना विलंब होऊ देऊ नका, काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रत्येकाने जबाबदारीने काम करावे. या पवित्र भूमीचा जागतिक दर्जाचा विकास व्हावा, हा आपल्या सगळ्यांचा संकल्प आहे. आपण सर्वांनी प्रामाणिकपणे आणि एकजुटीने काम करावे, अशा सूचना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी अधिकाऱ्यांना केल्या आहेत. या बैठकीत विकासकामांची रूपरेषा, निधी वितरण प्रक्रिया, निविदा प्रक्रिया आणि वेळापत्रक याबद्दल सविस्तर चर्चा झाली. जिल्हा प्रशासनाने कामांना गती देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलण्याचे आश्वासन दिले. आमदार किशोर जोरगेवार यांच्या सकारात्मक दृष्टिकोनामुळे दिक्षाभूमीच्या विकासकामांना नवा वेग मिळणार आहे. लवकरच हे पवित्र स्थान जागतिक स्तरावर नव्या स्वरूपात ओळखले जाईल, असा विश्वास आमदार किशोर जोरगेवार यांनी व्यक्त केला आहे.

