prabodhini news logo
Home कारंजा सेवाव्रती-समाजसेवी, परोपकारी,व्यक्तिमत्वाच्या समाजसेविका छाया गावंडे अकस्मात काळाच्या पडद्याआड.

सेवाव्रती-समाजसेवी, परोपकारी,व्यक्तिमत्वाच्या समाजसेविका छाया गावंडे अकस्मात काळाच्या पडद्याआड.

0
270

शारदा भुयार जिल्हा प्रतिनिधी वाशिम – कारंजा (लाड) : आदर्श समाजसेवेचा वसा घेऊन कित्येक वयोवृद्ध, दिव्यांग व निराधारांची सेवासुश्रूषा करीत असतांना, शून्यातून स्वतःचे विश्व उभारून,वाटचाल करीत असतांनाच,भावाच्या भेटीला गेल्यानंतर,भावाच्या मृत्युचे दुःख अनावर होऊन,हळव्या मनाच्या सौ.छायाताई गजाननराव गावंडे यांना हृदयविकाराचा धक्का येऊन,त्यांचे शुक्रवार दि.१३ जून २०२५ रोजी आकस्मिक निधन झाले.त्यांचा असा अचानक झालेला मृत्यु गावंडे परिवारासह त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या मनाला चांगल्याच वेदना देवून गेला आहे.स्व.छायाताई गावंडे यांच्या मृत्युनंतर त्यांच्या परिवारात त्यांचे पती गजाननराव गावंडे, कोमल व समृद्धी ह्या दोन विवाहित मुली आणि अविवाहित मुलगा कपिल आहे.स्व.छायाताई गावंडे ह्या, प्रेमळ,मायाळू,विश्वासू आणि कष्टकरी महिला असून त्यांना समाजातील गोरगरीब, वयोवृद्ध निराधारांविषयी जीव्हाळा होता.स्त्री शक्तीची चळवळ चालवून,बचत गटाच्या माध्यमातून महिलांना स्वपावलावर उभे करण्यात त्या खारीचा वाटा उचलत होत्या. शिवाय त्या कारंजा शहरातील अग्रणी असलेल्या,प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्थेच्या विद्यमान संचालिका होत्या. श्री. गुरुदेव सेवा मंडळ श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरीच्या कारंजा सेवाश्रमाच्या प्रचारिका होत्या. त्या विदर्भ लोककलावंत संघटना कारंजा आणि करंजमहात्म परिवाराच्या केवळ सक्रिय कार्यकर्त्याच नव्हे तर आधारस्तंभ होत्या. वयोवृद्ध,अनाथ,दिव्यांग व निराधारांच्या मायमाऊली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सौ. छायाताई गावंडे यांनी चिकनगुनिया आजाराचे वेळी आणि कोव्हिड-१९ कोरोना महामारी काळात रुग्नसेवा करीत असतांना त्यांनी रुग्नांचे मनोधैर्य खचू दिले नाही.रुग्नसेवेसोबतच,स्वतः स्वयंपाक करून त्यांनी कित्येक महिने लोकांना जेवणाचे डबे पुरवीले होते.त्यांना धार्मिक,आध्यात्मिक, सांस्कृतिक व सेवाभावी कार्याची मनापासून आवड होती.तनमनधनाने स्वतः राब राब राबून त्या निःस्वार्थ सेवा देत असत. त्यामुळे त्यांच्या अशा अकाली निधनाने सर्वत्र शोककळा पसरून हळहळ व्यक्त केल्या जात आहे.त्यांच्या मृत्युनंतर व्यथित होऊन अनेकांनी आपल्या शोकसंवेदना कळविल्या आहेत.दि.१४ जून २०२५ रोजी हिंदु स्मशानभूमी बायपास कारंजा येथे त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. याप्रसंगी त्यांच्या आप्त स्वकियांसह खूप मोठा जन समुदाय उपस्थित होता.याप्रसंगी विदर्भ लोककलावंत संघटना, करंजमहात्म्य परिवार,पत्रकार संघटना, स्त्री शक्ति पतसंस्था मंगरूळपिर,प्रशिक ग्रामिण सहकारी पतसंस्था कारंजा, अल्टरनेटिव्ह डॉक्टर्स असोसिएशन,मराठा सेवा संघ,जिजाऊ ब्रिगेड, संत नामदेव तुकाराम वारकरी परिषद,आई कामाक्षा मित्र मंडळ,खासदार संजय देशमुख मित्र मंडळ,आमदार सईताई डहाके मित्र मंडळ आदी तर्फे त्यांना श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.त्यानंतर सामुहिक श्रध्दांजली देण्यात आली.असे वृत्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी कळवीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here