काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष रितेश तिवारी यांचा आरोप
प्रशांत रामटेके संपादक प्रबोधिनी न्यूज – चंद्रपूर – केंद्रात व राज्यात भाजपची सत्ता असून, चंद्रपूर महापालिकेत देखील त्याच पक्षाचे महापौर होते. त्यांच्या कार्यकाळात अमृत पाणीपुरवठा योजनेचा प्रारंभ करण्यात आला. मात्र या योजनेची अंमलबजावणी ढिसाळ झाली असून, पावसाळ्याचे कारण पुढे करून भाजपचे आमदार आणि महानगराध्यक्ष आता अमृत योजनेचे काम तात्पुरते थांबवण्यासाठी निवेदन देत आहेत, यासारखे दुर्दैव नाही, अशी टीका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष रितेश (रामू) तिवारी यांनी केली आहे.
चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत २०१७ मध्ये अमृत पाणीपुरवठा योजनेचा कार्यादेश देण्यात आला होता. २०१९ पर्यंत ही कामे पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र आज 8 वर्षे लोटून देखील अनेक भागांमध्ये पाइपलाइनचे काम अपूर्ण आहे. घराघरांत पाणी पोहोचलेले नाही. जलमापकांची व्यवस्था कोलमडली आहे. दुसरीकडे, शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करून ते तस्सेच सोडल्यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.सत्ताधारी भाजपने कंत्राटदारांशी संगनमत करून अमृत योजनेचे काम उशिरा, हलगर्जीपणे आणि बेफिकिरीने केले. काम अपूर्ण असूनही योजनेची तारीफ केली जात आहे. मात्र, त्यांना जनतेच्या तहानेची जाणीव नाही,” असा हल्लाबोल रितेश तिवारी यांनी केला.
चंद्रपूरचे आमदार अपक्ष असताना मोठमोठ्या घोषणा करीत होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर आता तेच काम लांबणीवर टाकण्यात रस दाखवत आहेत. भाजप मनपा प्रशासकांच्या माध्यमातून स्वतःची कामे करून घेत असून, नागरिकांच्या कामांकडे दुर्लक्ष केले जात आहे.
भाजप आमदार किशोर जोरगेवार यांच्या सूचनेनुसार, भाजपच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी सुरू असलेले काम तात्पुरते थांबवण्याची मागणी केली आहे. भाजपने यासाठी रस्त्यांची खराब अवस्था आणि पावसामुळे होणाऱ्या अडचणीचे कारण दिले आहे. हे निव्वळ राजकीय स्टंट असून अपयश झाकण्यासाठी भाजप हे नाट्य रचत आहे. ज्यांच्या सत्ताकाळात ही योजना सुरू झाली आणि कामे रखडली, त्याच भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांना आता काम थांबवावे लागते, यासारखे दुर्दैव नाही.
चंद्रपूर शहरात अमृत योजनेमुळे रस्त्यांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. जलवाहिनी आणि मलनिस्सारणाच्या कामांमुळे अपघातांची शक्यता वाढली आहे. तरीही भाजपचे नेते केवळ निवेदन देत आहेत, हे केवळ प्रसिद्धीसाठी नौटंकी करीत असल्याचा आरोप रितेश तिवारी यांनी केला आहे. यापुढे नागरिकांना वेठीस धरण्याचा प्रकार झाला तर काँग्रेस आंदोलन करण्यास मागेपुढे बघणार नाही, असा इशाराही रितेश तिवारी यांनी दिला आहे.

