prabodhini news logo
Home अहेरी जिमलगट्टा येथे ‘दि जोश फाऊंडेशन’च्या पुढाकाराने क्ष-किरण (X-Ray) यंत्राचे उद्घाटन; सामाजिक उत्तरदायित्वातून...

जिमलगट्टा येथे ‘दि जोश फाऊंडेशन’च्या पुढाकाराने क्ष-किरण (X-Ray) यंत्राचे उद्घाटन; सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR) ओ. एन. जी. सी(ONGC) कंपनी चे आर्थिक सहाय्य.

0
162

विवेक मिरालवार
तालुका प्रतिनिधी अहेरी
830554583

जिमलगट्टा (ता. अहेरी) : गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम जिमलगट्टा येथे आज दि जोश फाऊंडेशनच्या पुढाकाराने नवीन क्ष-किरण (X-Ray) सेवा सुरु केली आहे.या यंत्राचे उद्घाटन माजी सभापती जिल्हा परिषद गडचिरोली भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या सेवेसाठी ऑइल अँड नॅच्युरल गॅस कॉर्पोरेशन (ओएनजीसी) कंपनीने सामाजिक उत्तरदायित्वातून (CSR) आर्थिक सहाय्य दिले. या प्रसंगी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जिमलगट्टा व परसारतील आदिवासी व ग्रामीण लोकांना आतापर्यंत क्ष-किरण व इतर वैद्यकीय तपासणीसाठी ६०–७० किमी अंतरावर असलेल्या अहेरी वा आलापल्ली येथे जावे लागत होते. खर्च व वेळ यामुळे अनेकांना आवश्यक तपासण्या करता येत नव्हत्या. हे लक्षात घेऊन ‘दि जोश फाऊंडेशन’ने या भागात अगोदरच सुरु असलेल्या पॅथॉलॉजी सेवेसोबतच क्ष-किरण सेवा उपलब्ध करून देत आरोग्याच्या दृष्टीने मोठा दिलासा दिला आहे. ही सेवा ‘ना नफा-ना तोटा’ या तत्त्वावर अत्यल्प दरात चालवण्यात येणार आहे.

यावेळी बोलताना दि जोश फाउंडेशन च्या अध्यक्ष डॉ. संगीता मेडी म्हणाल्या, “आमच्या ग्रामीण बांधवांना मोठमोठ्या शहरात न जाता गावातच योग्य वैद्यकीय तपासणी करता यावी, यासाठी आम्ही ही सुविधा सुरु केली आहे. ओएनजीसी कंपनीने यासाठी दिलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. हा केवळ आर्थिक नव्हे, तर सामाजिक भान जपणारा उपक्रम आहे.”

भाग्यश्री ताई आत्राम हलगेकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले, “जिमलगट्टा परिसरात अशा प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध होणे ही अत्यंत गरजेची होती. या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, हीच अपेक्षा आहे.”

दि जोश फाऊंडेशन गेल्या काही वर्षांपासून जिमलगट्टा व परिसरातील गरीब, आदिवासी व वंचित लोकांसाठी आरोग्य, शिक्षण, व्यसनमुक्ती अशा अनेक सामाजिक क्षेत्रात काम करत असून या संस्थेच्या उपक्रमामुळे गावकऱ्यांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here