
गडचिरोली दि. ९ जुलै : शैक्षणिक सत्र २०२५-२६ करिता अनुसूचित जाती, इमाव (इतर मागासवर्ग), विमाप्र (विकसनशील मागासवर्गीय प्रवर्ग) व विजाभज (विशेष मागास प्रवर्ग) या घटकांतील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी महाडिबीटी ऑनलाईन पोर्टलवर अर्ज प्रक्रिया सुरु झाली आहे. दिनांक ३० जून, २०२५ पासून ही ऑनलाइन प्रणाली कार्यरत झाली असून, पात्र विद्यार्थ्यांनी आपले नवीन (फ्रेश) किंवा नूतनीकरण (रिन्युअल) अर्ज त्वरित सादर करावेत, असे आवाहन समाजकल्याण विभागाने केले आहे.
ही योजना समाज कल्याण विभाग व बहुजन कल्याण विभागाच्या वतीने भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्वांनुसार राबविण्यात येते. या अंतर्गत मागील शैक्षणिक सत्र २०२४-२५मध्ये अर्ज न करता राहिलेल्या विद्यार्थ्यांसाठीही अर्ज सादर करण्याची संधी उपलब्ध आहे.
जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना या प्रक्रियेबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या अर्ज सादर होण्याची खात्री करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी https://mahadbtmahait.gov.in/Home/Index या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अटी व शर्ती याविषयी सविस्तर माहिती घ्यावी.
महाडिबीटी प्रणालीवर अर्ज सादर करताना शासनाच्या निर्णयानुसार लागू असलेल्या अटी व शर्तींचे पालन करणे अनिवार्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी वेळ न दवडता अर्ज सादर करण्यासाठी तात्काळ पावले उचलावीत, असे आवाहन समाज कल्याण विभागचे सहाय्यक आयुक्त डॉ सचिन मडावी यांनी केले आहे.















